| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ९ एप्रिल २०२५
कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची ५ मीटरने वाढविण्याचा निर्धार केला असून, याबाबत नुकतीच नवी दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील यांची भेट घेऊन या प्रस्तावाला केंद्राची मान्यता मिळावी, अशी विनंती केली आहे.
या विषयावर येत्या पंधरा दिवसांत निर्णय होण्याची शक्यता असून, जर प्रस्तावाला मंजुरी मिळाली, तर कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्याच्या काही भागांवर संभाव्य पुराचा मोठा धोका निर्माण होणार आहे. याच पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी आणि पूरग्रस्त नागरिकांनी एकत्र येत आवाज उठवण्याचा निर्णय घेतला आहे.
कर्नाटक सरकारने आधीच अलमट्टी धरणाची उंची ५१९ मीटरवरून ५२४ मीटरपर्यंत वाढविण्याची योजना जाहीर केली आहे. उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनी याबाबत पत्रकार परिषदेत सरकारच्या ठाम भूमिकेची आणि निधीच्या तरतूदीची माहिती दिली होती. तसेच त्यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांसोबत चर्चा करून यासाठी केंद्राची मंजुरी मिळवण्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान, आंध्रप्रदेश आणि तेलंगणासारख्या राज्यांनीही या प्रस्तावाला विरोध दर्शवला असून, २०१३ च्या लवाद निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. मात्र महाराष्ट्र सरकारकडून यावर कोणताही ठोस आक्षेप नोंदवण्यात आलेला नाही, हे खुद्द जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील यांनी अधिवेशनात स्पष्ट केले होते. त्यामुळे या प्रश्नाकडे महाराष्ट्रातील अनेक प्रमुख नेते दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
आता सांगलीतील खासदार विशाल पाटील, आमदार अरुण लाड, रोहित पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत अलमट्टीच्या उंची वाढीविरोधात तीव्र आंदोलन उभारण्याचा निर्धार करण्यात आला आहे. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात एक दिवसाचा बंद पाळून निषेध व्यक्त केला जाणार आहे.
आमदार रोहित पाटील यांनी विधानसभेत आणि रस्त्यावर या मुद्द्यावर संघर्ष करण्याची तयारी दर्शवली असून, इतर जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधींनाही एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. ५२४ मीटर उंचीमुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना संभाव्य पूरधोका वाढण्याची शक्यता असल्याने, या निर्णयाला थांबवण्यासाठी सर्व स्तरांवर लढा देण्याचा निर्धार करण्यात आला आहे.