yuva MAharashtra एका झाडासाठी 1 कोटींचा मोबदला ! महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या संघर्षाला यश, हायकोर्टाच्या आदेशाने रेल्वेला रक्कम लागली भरावी !

एका झाडासाठी 1 कोटींचा मोबदला ! महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या संघर्षाला यश, हायकोर्टाच्या आदेशाने रेल्वेला रक्कम लागली भरावी !


| सांगली समाचार वृत्त |
यवतमाळ - दि. ११ एप्रिल २०२५

यवतमाळ जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने आपल्या जमिनीत उभ्या असलेल्या रक्तचंदनाच्या झाडासाठी न्यायालयात लढा दिला आणि अखेर त्याला यश मिळालं. हायकोर्टाने रेल्वे विभागाला 1 कोटी रुपये अंतरिम मोबदला देण्याचा आदेश दिला असून, त्यातील 50 लाख रुपये शेतकऱ्याला काढण्याची मुभा दिली आहे.

काय आहे प्रकरण ?

पुसद तालुक्यातील खरशी गावचे शेतकरी केशव शिंदे आणि त्यांच्या पाच मुलांनी 7 ऑक्टोबर 2024 रोजी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यांच्या 2.29 हेक्टर जमिनीवरून वर्धा-यवतमाळ-पुसद-नांदेड रेल्वे मार्ग जात असल्यामुळे रेल्वे प्रशासनाने ती जमीन संपादित केली होती.

जमिनीचा मोबदला मिळाल्यानंतरही त्यांचं एक दुर्मिळ रक्तचंदनाचं झाड, काही इतर झाडं आणि भूमिगत पाईपलाईन यासाठी त्यांना कोणताही मोबदला मिळालेला नव्हता. यासाठी त्यांनी 2014 पासून अनेक शासकीय विभागांना पत्रव्यवहार केला. अखेर आठ वर्षांनी त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला.

झाडाचं मूल्य ठरवण्याआधीच 1 कोटींचा मोबदला

शिंदे कुटुंबाने याचिकेत झाडाच्या मूल्यांकनाची मागणी केली होती. त्यानंतर हायकोर्टाने रेल्वे प्रशासनाला एका झाडासाठी तात्पुरता 1 कोटी रुपयांचा मोबदला भरावा असा आदेश दिला. हा आकडा अंतिम नाही; कारण झाडाचं मूल्यांकन अद्याप पूर्ण झालेलं नाही.

वकील अंजना राऊत नरवडे यांनी सांगितलं की, रक्तचंदनाचं अंतिम मूल्य सुमारे 5 कोटींवर जाऊ शकतं. वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह एक समिती त्याचे मूल्य ठरवेल.

रक्तचंदनाचं झाड कसं ओळखलं गेलं?

शिंदे कुटुंबाला आपल्या जमिनीत रक्तचंदन आहे याची माहिती नव्हती. पण, रेल्वेच्या सर्वेक्षणावेळी आंध्र प्रदेशातून आलेल्या कर्मचाऱ्यांनी हे झाड रक्तचंदनाचं असल्याचं ओळखलं. यानंतर शिंदे कुटुंबाने युट्यूब आणि स्थानिक तज्ज्ञांकडून खात्री करून घेतली आणि झाडाच्या मोबदल्यासाठी अधिकाऱ्यांकडे मागणी केली.

प्रलंबित बाबी

झाडांशिवाय भूमिगत पाईपलाईन आणि इतर झाडांचा मोबदला अजूनही मिळालेला नाही. त्यासाठीही याचिकाकर्त्यांनी मागणी केली आहे.

शेतकऱ्याची प्रतिक्रिया

पंजाब शिंदे यांनी सांगितलं की, अद्याप मोबदला अपेक्षेप्रमाणे मिळालेला नाही, पण न्यायालयाच्या आदेशामुळे पुढील निर्णयांबाबत आशा आहे. त्यांनी आपल्या निवृत्तीचे संपूर्ण पैसे या खटल्याच्या लढ्यात खर्च केले आहेत.

रक्तचंदन – दुर्मिळ आणि मौल्यवान

रक्तचंदन झाड मुख्यतः आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या सीमेवर आढळतं. त्याच्या लाकडाची घनता जास्त असल्यामुळे ते पाण्यातही बुडतं. चीन, जपानसह अनेक देशांमध्ये या लाकडाला मोठी मागणी आहे, ज्यामुळे त्याची किंमतही प्रचंड असते.