| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ६ फेब्रुवारी २०२५
अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक राजकीय नेत्यांनी या विधानाचा निषेध करत कठोर कारवाईची मागणी केली आहे. खासदार आणि शिवरायांचे वंशज उदयनराजे भोसले तसेच आमदार सुरेश धस यांनीही या प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे.
"अशांना कठोर शासन झाले पाहिजे"
उदयनराजे भोसले यांनी या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया देत म्हटले की, "छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण जगासाठी प्रेरणास्थान आहेत. त्यांनी लोकशाहीचा पाया रचला आणि सर्व जाती-धर्मांतील लोकांना समान न्याय दिला. अशा महापुरुषांबद्दल अपशब्द काढणाऱ्यांना समाजाने धडा शिकवला पाहिजे."
ते पुढे म्हणाले, "अशा प्रवृत्ती वाढल्या तर देशाच्या अखंडतेला धोका निर्माण होईल. याविरोधात कडक कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे. आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन संबंधित व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करू."
"अशा विकृत विचारसरणीला आळा घालायला हवा"
आमदार सुरेश धस यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना तीव्र संताप व्यक्त केला. त्यांनी म्हटले, "राहुल सोलापूरकर नावाचा एक अभिनेता महाराजांबद्दल अपमानास्पद वक्तव्य करतो, हे अत्यंत दुर्दैवी आहे. अशा विकृत विचारसरणीला समाजात थारा मिळू नये. जनतेने अशांना वाळीत टाकले पाहिजे."
ते पुढे म्हणाले, "शिवाजी महाराजांनी संपूर्ण समाजाला एकत्र आणले, परकीय आक्रमणांना प्रतिकार केला आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यांच्याबद्दल कोणीही अनादर व्यक्त करतो, हे सहन करता येणार नाही. प्रशासनाने तातडीने कारवाई करून संबंधित व्यक्तीला कठोर शिक्षा करावी."
डिजिटल सेन्सॉरशिपची गरज
या वादग्रस्त विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, यावर नियंत्रण आवश्यक असल्याचे उदयनराजे यांनी म्हटले. "इतिहासाची चुकीची माहिती पसरवणारे व्हिडिओ इंटरनेटवर सहज व्हायरल होतात, त्यामुळे सरकारने डिजिटल सेन्सॉरशिपसाठी ठोस पावले उचलावीत," अशी त्यांनी मागणी केली.
शिवभक्तांमध्ये रोष; कडक कारवाईची मागणी
या संपूर्ण प्रकरणामुळे राज्यभर शिवभक्तांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. अनेक संघटनांनीही याचा तीव्र निषेध नोंदवला असून, प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. शिवाजी महाराजांबद्दल आदर असलेल्या प्रत्येकाने या प्रकाराविरोधात आवाज उठवला पाहिजे, असे मत अनेक नेत्यांनी व्यक्त केले आहे.