yuva MAharashtra सांगलीमधील कॅफे शॉप पुन्हा वादात, शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांची दुकानांवर धडक !

सांगलीमधील कॅफे शॉप पुन्हा वादात, शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांची दुकानांवर धडक !


फोटो सौजन्य - गुगल फोटो गॅलरी

| सांगली समाचार वृत्त |
मिरज - दि. १३ जानेवारी २०२५
सांगली जिल्ह्यातील अवैध कॅफे शॉपचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मिरज शहरामध्ये बेकायदेशीररित्या कम्पार्टमेंट करून कॅफे शॉप चालवण्याचा प्रकार सुरू असल्याता आरोप शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानने केला आहे. मिरजेमधील कॅफे शॉपवर शिवप्रतिष्ठान युवाच्या कार्यकर्त्यांनी धडक दिली, यानंतर पोलिसांनीही या शॉपची पाहणी केली आहे.

अल्पवयीन मुलींना कॅफेमध्ये प्रवेश देऊन त्या ठिकाणी अश्लिल प्रकार सुरू असल्याचा आरोप करत शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानकडून ही कॅफे शॉप बंद पाडण्यात येत आहेत. यानंतर मिरज पोलिसंनी तातडीने धाव घेत कॅफे शॉपची पाहणी केली आहे.


कॅफे शॉपमध्ये पारदर्शकता आणि सीसीटीव्ही असणं आवश्यक असताना या ठिकाणी सर्व नियमांचं उल्लंघन सुरू असल्याचा प्रकार समोर आल्याचा आरोपही शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानकडून करण्यात आला आहे. या कॅफे शॉपवर कारवाई न झाल्यास शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तान त्यांच्या स्टाईलने उत्तर देईल, असा इशाराही कार्यकर्त्यांनी दिला आहे.

मागच्या वर्षी एका कॉफी शॉपमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना घडली होती, यानंतर शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानकडून सांगली शहरातल्या अनेक कॅफे शॉपची तोडफोड करण्यात आली होती, यानंतर सांगली पोलिसांनी जिल्ह्यातील अनेक कॅफे शॉपवर कारवाई केली होती.