| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १३ जानेवारी २०२५
जागतिक बॅँकेच्या सहकार्याने राज्याला पूर नियंत्रणासाठी ३ हजार २०० कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे. यातून सांगली महापालिकेला सुमारे साडेचारशे ते पाचशे कोटींचा निधी मंजूर होण्याची शक्यता आहे. या कामांचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे,'' अशी माहिती आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिली. जागतिक बॅँकेच्या माध्यमातून सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांत कृष्णा नदीला येणाऱ्या महापुराचे नियंत्रण करण्यासाठी ३२०० कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे. जागतिक बॅँकेच्या अधिकाऱ्यांनी काही महिन्यांपूर्वी सांगलीसह पूरपट्ट्यात पाहणी केली. महापुरात होणाऱ्या नुकसानीची त्यांनी माहिती घेतली. जलसंपदा विभाग, महापालिका अधिकाऱ्यांनी त्यांना आवश्यक कागदपत्रे, माहिती सादर केली आहे.
आयुक्त गुप्ता म्हणाले, ''महापालिकेने प्रायमो या कंपनीला सर्व्हे करण्याचे काम दिले आहे. संस्था पूर नियंत्रणासाठी शास्त्रीय अभ्यास करून कोणती कामे करावी लागतील हे महापालिकेला सुचवणार आहे. त्यानंतर पालिका या कामांचा प्रस्ताव महिन्याभरात शासनाला पाठवणार आहे. केंद्र सरकारने सांगलीसह राज्यातील काही महपालिकांची ई बस प्रकल्प राबवण्यासाठी निवड केली आहे. अन्य महापालिकांत हा प्रकल्प गतीने कार्यान्वित झाला आहे; मात्र सांगलीत महापालिकेचा प्रकल्प अजनूही रखडला आहे. '' ते म्हणाले ''पालिका प्रशासनाने गतीने कार्यवाही करत या प्रकल्पासाठी चार्जिंग स्टेशन, बस डेपोसाठी मिरजेत जागा निश्चित केली. या कामाच्या निविदा काढून संबंधित ठेकेदास वर्क ऑर्डरही दिली आहे; मात्र या जमिनीबाबत न्यायालयीन वाद निर्माण झाल्याने प्रकल्प रखडला आहे.
सांगली व कुपवाड शहरासाठी वारणा उद्भव पाणी योजना राबवण्याचा महापालिकेचा प्रस्ताव आहे. सुमारे ३०० कोटींची ही योजना असून सर्वेक्षणानंतर अंतिम प्रस्ताव तयार होईल. त्यानंतर तो तातडीने मंजुरीसाठी शासनाला सादर केला जाणार आहे, अशी माहितीही आयुक्त गुप्ता यांनी दिली.