| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २४ जानेवारी २०२५
सांगली महापालिकेने नुकत्याच केलेल्या मालमत्ता सर्वेक्षणामुळे अनेक जुन्या इमारतींच्या घरपट्टीत दुप्पट, तिप्पट, तर कधी दसपट वाढ झाल्याचे नागरिकांच्या लक्षात आले आहे. वाढीव बांधकाम किंवा नवीन नोंदणी नसतानाही कर कसा वाढला, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या पार्श्वभूमीवर, घरपट्टी मूल्यांकनावरील नोटिसांना सहा महिन्यांची स्थगिती देऊन फेरसर्वेक्षण करण्याची मागणी आमदार सुधीर गाडगीळ यांनी महापालिकेच्या बैठकीत केली.
घरपट्टीतील वाढीव कराचे कारण?
महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त नीलेश देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगली महापालिका क्षेत्रातील 1.52 लाख मालमत्तांची नोंदणी होती, परंतु नव्या सर्वेक्षणानंतर 2.08 लाख मालमत्तांची नोंद झाली आहे. यामध्ये 50 हजारांहून अधिक नव्या मालमत्तांची नोंदणी करण्यात आली असून त्यावर आता कर आकारला जात आहे. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होऊन वार्षिक मागणी 70 कोटींवरून 110 कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
नागरिकांच्या समस्या आणि आमदार गाडगीळ यांची भूमिका
आमदार गाडगीळ यांनी जुन्या इमारतींवरील अवाजवी कर वाढीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सांगितले, "नवीन बांधकाम किंवा वाढीव बांधकामावर कर लावणे योग्य आहे, पण जुनी घरपट्टी दुप्पट, तिप्पट वाढवणे गैर आहे." पार्किंगची समस्या आणि त्यासंदर्भातील कर सवलतीवरही चर्चा झाली.
महापालिकेची भूमिका
महापालिका आयुक्त गुप्ता यांनी स्पष्ट केले की, करवाढ किंवा कराच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. मात्र, नोंद नसलेल्या मालमत्तांना आणि वाढीव बांधकामांना कर आकारण्यात आला आहे. नागरिकांना मिळालेल्या नोटिसांवर 21 दिवसांच्या आत हरकत नोंदवता येईल. तसेच, नोटिसींवर क्यूआर कोडद्वारे ऑनलाइन हरकत नोंदवण्याची सुविधा देण्यात आली आहे.
भाडेकरू मालमत्तांवरील कराचा प्रश्न
भाडेकरू इमारतींवरील 57% कर अन्यायकारक असल्याचे नमूद करून आयुक्त गुप्ता यांनी यामध्ये सवलतीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. पार्किंगसंदर्भातील करावर अभ्यास करून योग्य निर्णय घेण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
नवीन महापालिका मुख्यालयाचा प्रस्ताव
महापालिकेच्या नवीन मुख्यालयासाठी लवकरच अडीच एकर जागेत नवीन इमारतीचे काम सुरू केले जाईल, असे गाडगीळ यांनी जाहीर केले. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारचा निधी मिळवण्याचा प्रयत्नही केला जाणार आहे.
सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि पाणीपुरवठा सुधारणा
शहरातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि पाणीपुरवठा योजनांसाठी कोट्यवधी रुपयांचे प्रस्ताव शासनाला पाठवण्यात आले आहेत. यामध्ये सांगलीवाडी आणि सांगलीत नवे प्रकल्प उभारले जातील, अशी माहिती गाडगीळ यांनी दिली.