| सांगली समाचार वृत्त |
बीड - दि. २५ जानेवारी २०२५
संपूर्ण राज्यात चर्चेत असलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे मुंडे आणि कराड यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
दरम्यान, खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड यांच्यावर पोलिसांनी मकोका अंतर्गत कारवाई केली आहे. अशा परिस्थितीत सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एका तरुणीने भाजप आमदार सुरेश धसांशी संबंधित व्यक्तींवर गंभीर आरोप केले आहेत, ज्यामुळे राजकीय वर्तुळात नवी चर्चा सुरू झाली आहे.
व्हिडिओमध्ये संबंधित तरुणीने तुषार कोकणे नावाच्या युवकावर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. शिवाय, तुषार कोकणे हा सुरेश धस यांचा नातेवाईक असल्याचा हवाला देत तिच्यावर राजकीय दबाव आणल्याचेही सांगितले आहे. तरुणीच्या म्हणण्यानुसार, आरोपीने तिच्याशी दुर्व्यवहार केला आणि तपासादरम्यान पोलिसांनी तिला खोटं बोलण्यास प्रवृत्त केलं.
ही घटना नोव्हेंबर-डिसेंबर 2021 मधील असून, मे 2023 मध्ये आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी काही काळ फरार होता. व्हायरल व्हिडिओमध्ये तरुणीने आरोपीवर कारवाईची मागणी केली असून, लग्न करावे किंवा कायदेशीर कारवाई केली जावी, अशी मागणी केली आहे.
या प्रकरणामुळे भाजप आमदार सुरेश धस यांची अडचण वाढणार का, यावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.