| सांगली समाचार वृत्त |
पंढरपूर - दि. १३ जानेवारी २०२५
मेस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनाचा आरोप असलेला बीडचे आधुनिक वाल्या अर्थात वाल्मिकी कराड याचे नवे नवे प्रताप समोर येत आहेत. वाल्मिकी कराड याच्यावर अद्याप संतोष जोग यांच्या कोणाचा प्रत्यक्ष आरोप नसला तरी कराड याच्या भोवतीच सारे प्रकरण घोंगावते आहे. आज सकाळी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी वाल्मिकी कराडला सुद्धा मोक्का लावा या मागणीसाठी पाण्याच्या टाकीवर चढून शोले टाईप आंदोलन केले. दोन कोटी रुपयांच्या खंडणीप्रकरणी वाल्मिकीवर गुन्हा दाखल झाल्यानंतर आता त्याचे संपूर्ण महाराष्ट्रातील गुन्हेगारीचे कनेक्शन समोर येत आहे.
वाल्मिकी कराड याने 11 कोटी 20 लाख रुपयांना फसवल्याचा आरोप पंढरपूर येथे शेतकरी दिलीप नागणे यांनी केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार वाल्मिकी कराड याने ऊस तोडणी यंत्रमालकांना अनुदानाचे आमिष दाखवत सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील 140 ऊस तोडणी यंत्र मालकांना तब्बल 11 कोटी 20 लाख रुपये उकळले आहेत.
हे प्रकरण मागील सरकारच्या कार्यकाळातील आहे. त्यावेळी कराड याने कृषी मंत्री हे माझे जवळचे असून ऊस तोडणी यंत्राला प्रत्येकी 36 लाखाचे अनुदान मिळवून देतो असे सांगून प्रत्येकाकडून आठ लाख रुपये घेतले होते. मात्र सरकार गेले तरी ऊस तोडणी यंत्र मालकांनी कराड यांच्याकडे दिलेल्या पैशासाठी तगादा लावला, तेव्हा कराड येणे या सगळ्यांना बीडला बोलवून घेतले व तिथे पोहोचल्यानंतर माझ्याकडे तुमचे कुठलेही पैसे नाहीत असे सांगून मारहाण केल्याचे नागणे यांचे म्हणणे आहे. जीवाच्या भीतीने कोणीच पोलिसात तक्रार दाखल केली नाही. मात्र आता वाल्मिकी कराड पोलिसांच्या ताब्यात असल्याने ऊस तोडणी यंत्र धारकांनी याबाबत गौप्यस्फोट केला आहे.
अद्याप याबाबत कोणत्याच पोलीस ठाण्यात तक्रार दाखल नसली तरी लवकरच ऊस तोडणी यंत्रधारक वाल्मिकी कराड याच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जर या प्रकरणात पुरावे सापडले, तर वाल्मिकी कराडचा पाय अजूनच खोलात जाणार आहे.