| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १४ डिसेंबर २०२४
सांगली महापालिका आपल्या रौप्य महोत्सवी वर्षानंतरही कारभारात सुधारणा करू शकली नाही. याचे अनेक दाखले देण्यात येतात. सध्या अशाच एका अधिकाऱ्यांच्या कर्तबगारीने सांगली महापालिकेचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. प्रकरण आहे मिरज विभागीय कार्यालयातील. मिरजेतील 235 कर्मचाऱ्यांच्या नुकत्याच बदल्या करण्यात आल्या. विशेष म्हणजे यातील दोन कर्मचारी वर्षभरापूर्वीच मृत झाले आहेत. आता या बदल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
बदली केलेले दोन मृत व्यक्ती स्वच्छता कर्मचारी आहेत. त्यांच्या बदलीच्या ऑर्डरवर वरिष्ठ स्वच्छता निरीक्षकाची सही आहे. पैकी पंकज होळकर या कायम सफाई कर्मचाऱ्यांचे वर्षभरापूर्वीच निधन झाले आहे. त्यांची बदली कुपवाड स्वच्छता विभागात करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे नंदकुमार लोंढे यांचे अवघ्या चार महिन्यापूर्वी निधन झाले आहे. या मृत व्यक्तींची नावे अजूनही रेकॉर्डवर कशी ? हा प्रश्न उपस्थित होत असतानाच, या काळातील पगार काढला गेला आहे का ? आणि ही गंभीर बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कशी काय लक्षात आली नाही असाही प्रश्न उपस्थित होतो.
सांगली, मिरज व कुपवाड महापालिका निर्माण होऊन 25 वर्षे होऊन गेले. अद्यापही तिन्ही शहरात संपूर्ण विकास होऊ शकला नाही. त्याहीपेक्षा महापालिकेच्या कारभारात सुधारणा दिसून येत नाही. विद्यमान आयुक्त शुभम गुप्ता हे नियुक्त झाल्यानंतर काही प्रमाणात बदल जाणवत आहे. मात्र अजूनही प्रशासकीय यंत्रणेवर जरब बसवण्याची आवश्यकता नागरिकांतून व्यक्त होत आहे. मिरज विभागीय कार्यालयातील या बदली प्रकरणातून अन्य काही मृत कर्मचाऱ्यांची नावेही रजिस्टरवर आहेत का ? याचाही शोध घेण्याची आवश्यकता आहे. आणि जर असतील, त्यांचा पगार निघाला आहे का, निघाला असेल तर तो कोणी काढला, कोणाच्या खात्यावर जमा झाला याचीही चौकशी होण्याची गरज व्यक्त होत आहे.
दरम्यान शिवराज्य सफाई कर्मचारी सेनेचे मिरज अध्यक्ष प्रकाश ढंग म्हणाले, सफाई कर्मचार्यांच्या केलेल्या बदल्या या चुकीच्या पद्धतीने केलेल्या आहेत. अधिकार्यांकडून मोठा गोंधळ झाला आहे. मृत कर्मचार्यांच्या बदल्या कशा काय होऊ शकतात? असे चुकीचे आदेश देणार्या संबंधित अधिकार्यांवर त्वरित कारवाई करावी, अन्यथा महापालिकेसमोर तीव्र आंदोलन करू इशारा दिला आहे.