फोटो सौजन्य : Picxy photo
| सांगली समाचार वृत्त |
पलूस - दि. १३ डिसेंबर २०२४
पुणे मिरज रेल्वे विद्युतीकरणाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले असून, या दुहेरी करण्यासाठी रेल्वे मार्गाच्या शेजारील काही जमिनी हस्तांतरित करण्यात आल्या आहेत. मात्र अद्यापही काही जमिनींचा मोबदला रेल्वे प्रशासनाकडून दिला गेला नाही. याबाबत संबंधितांकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर पुणे मिरज रेल्वे दुहेरीकरण प्रकल्पात पलूस तालुक्यातील वसगडे येथील ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित झाले आहेत, अशा शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईच्या मागणीसाठी रेल रोको आंदोलन पुकारले होते. यावेळी बाधित शेतकरी व रेल्वे पोलिसात झटापट झाल्याने काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. अखेर रेल्वे, महसूल व पोलीस प्रशासनासोबत येथील संबंधित शेतकरी यांच्या शिष्टमंडळ यांच्यात बैठक होऊन, मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिल्याने हे आंदोलन स्थगित करण्यात आल्याने पुढील अनर्थ टळला.
याबाबत अधिक माहिती अशी की पुणे मिरज रेल्वे दुहेरीकरणात अनेक शेतकऱ्यांच्या हस्तांतरित करण्यात आल्या. मात्र संबंधितांना नुकसान भरपाई देण्यात आली नव्हती. यावेळी बाधित शेतकऱ्यांनी वारंवार रेल्वे प्रशासनाकडे नुकसान भरपाई चे मागणी केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून रेल्वे प्रशासनाने दुहेरीकरणाचे काम पूर्ण केले. तेव्हा या मार्गावरील पलूस तालुक्यामधील वसगडे येथील बाधित शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर आंदोलन करून रेल रोको करण्याचा इशारा दिल्यानंतर, तत्कालीन रेल्वे मंत्र्यांनी तत्कालीन रेल्वे मंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी आदेश देऊनही रेल्वे प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले होते.
या प्रकारामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी अखेर रेल्वे प्रशासनाला वंदे भारत रेल्वे रोखण्याचा इशारा दिला होता. तेव्हा पुन्हा एकदा रेल्वे प्रशासनाने बाधित शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्या 15 ऑक्टोंबर पूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्याने ते आंदोलन स्थगित केले होते. मात्र आज अखेर या मागण्या मान्य न झाल्याने वसगडे परिसरातील बाधित शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. परंतु याकडे हे रेल्वे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने, बाधित शेतकरी मोठ्या प्रमाणावर रेल्वे मार्गावर जमा झाले. तेव्हा रेल्वे पोलीस व भिलवडे पोलीस ठाण्याचे कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले.
यावेळी प्रांताधिकारी रणजीत भोसले, भिलवडी पोलीस स्टेशनचे सहाय्य पोलीस निरीक्षक भगवान पालवे, तहसीलदार दीप्ती रिठे, रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी श्रीनिवास, मिरज रेल्वे पोलीस निरीक्षक संभाजी काळे, पोलीस निरीक्षक सत्वीर सिंग आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार रेल्वे रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा बाधित शेतकरी आणि पोलिसांमध्ये झटापट ही झाली. यामुळे परिसरात काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र प्रशासन व शेतकऱ्यांमध्ये आंदोलन स्थळे चर्चा होऊन 12 फेब्रुवारी 2025 पर्यंत संबंधित शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला देण्यात येईल, असे आश्वासन दिले. यासाठी जानेवारी 2019 पासून केलेले अतिक्रमण मान्य केले जाईल असेही लेखी पत्र जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. तसेच जुन्या रेल्वे मार्गाच्या बाजूला झालेल्या अतिक्रमणाबाबत भुईबाडे प्रस्ताव सादर करण्याचे रेल्वे प्रशासनाने मान्य केले. यानंतर संबंधित बाधित शेतकऱ्यांनी आपले आंदोलन 12 फेब्रुवारी पर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.