| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ११ डिसेंबर २०२४
काल एका लग्नाला जायचा योग आला... लग्न मुलाकडचं... पार्टी तशी गडगंज... लग्नानिमित्त केलेली सजावट, वधूवरांचे प्रत्येक विधीसाठीचे किंमती ड्रेस, वधू-वर मंगल कार्यालयाच्या हॉलमध्ये येताना, वरासाठी घोडा, वधू साठी सजवलेला छोटाच, पण सजवलेला रथ. त्यांच्या स्वागतासाठी केलेली आतषबाजी, मंगलअक्षदा वेळी गायक गयिकेनी गायलेले मंगलाष्टकं, तसेच मंगल अक्षदा होण्यापूर्वी आणि नंतर याच गायक, गायिकेने गायलेली कराओके गाणी विशेषतः मंगलाष्टकावेळी स्टेजवर अगदी मोजकीच मंडळी... अक्षताही कार्यालयातील पहिल्याच रांगेतील मंडळींना दिलेल्या, वधूवरांना अक्षता फेकून मारणे नाही... वधू-वर एकमेकांना हार घालताना, मित्रमंडळींना त्यांना उचलणे नाही..ह
याच दरम्यान वधू-वरांचं प्री-वेडिंग शुटिंग एका मोठ्या पडद्यावर दाखवण्यात आलं... अन् सांगण्यासारखं बरंच काही... खरंतर कौतुकास्पदच म्हणायला हवं... कारण सारी शिस्त वाखाणण्यायोग्यच होती.. डामडौल होता, पण त्याचं प्रदर्शन नव्हतं... प्री-वेडिंग केलेलं शूटही डोळ्यांना खटकत नव्हतं... यानंतर होतं ते बुफे पध्दतीचं जेवण... शिस्तबद्ध मांडलेले खाद्यपदार्थांचे स्टॉल... त्यावरील पदार्थ, त्यांची जिभेवर रेंगाळणारी मस्त चव... हे पाहिल्यानंतर माजी आमदार गुलाबराव पाटील यांचे ते सर्वश्रुत वाक्य आठवले.. ते एका वेगळ्या पद्धतीने सुचलं, "काय ते लगीन... काय त्यो डामडौल... काय ते जेवान... आन् काय ती लोकं ?... अगागां !"
हे सुरू असतानाच तेथील अभ्यागतांमध्ये सुरू असलेली चर्चा कानावर पडली... चर्चेचं कारण होतं, संपन्न होत असलेला अन् इतर ठिकाणी पाहिलेल्या लग्नांची तुलना... लग्नकार्यात होणारा अनावश्यक खर्च, संपत्तीचे प्रदर्शन, प्री वेडिंग च्या नावाखाली वधूवरांचे होणारे शूटिंग.... खरंतर अशा प्री वेडिंग शूटच्या बाबत अनेक ठिकाणी, अनेक वेळा चर्चा झाली आहे... विशेषतः काही शूटमध्ये वधूचे होणारे, किंवा केले जाणारे अंगप्रदर्शन हा चर्चेचा विषय असतो...वरील वर्णन वाचल्यानंतर, वाचकांच्याही नजरेसमोर त्यांनी अनुभवलेले लग्नाचे प्रसंग डोळ्यासमोर तरळले असतील... वास्तविक लग्न कार्य म्हणजे एक मंगल सोहळा असतो, दोन जीवांचे... दोन कुटुंबांचे... दोन घराण्यांचे सदैव काळासाठी जोडले जाणारे ऋणानुबंध असतात... त्यातील मांगल्य जपले जावे ही अपेक्षा चुकीची नाही... पण अलीकडील काही लग्नात ते जपले जाते का ?... हा चर्चेचा आणि चिंतनाचा विषय...
अलीकडे काही ठिकाणी प्री-वेडिंग शूट पद्धत बंद करण्याचा कौतुकास्पद निर्णय होतो आहे.. आमचा किंवा लोकांचा प्री-वेडिंगला विरोध नाही, नसावा... पण ज्या प्री-वेडिंग मध्ये अनावश्यक खर्च किंवा प्रसंग दिसतात त्याला मात्र अनेकांचा विरोध आहे. असायलाच हवा. लग्नाच्या ठिकाणी होणारे अनावश्यक खर्च पाहिले की, यातून कित्येक गरिबांच्या मुला मुलींचे लग्न होतील... हौसेला मोल नाही हे खरे, पण हौस करताना श्रीमंतीचे प्रदर्शन टाळायला हवे, असे अनेकांचे मत...
कारण ही अशी लग्नं अन् प्रदर्शन आपल्या भारतीय संस्कृतीला अपेक्षित नाही... आणि या अपेक्षेला कोणाचा आक्षेपही नसावा... लग्नकार्य हे पारंपारिक पद्धतीने, त्यातील मांगल्य जपूनच व्हायला हवं... पटलं होय म्हणा... नाही तर... आणि हो... आवडली पोस्ट तर पुढे पाठवायला विसरू नका...