yuva MAharashtra पाच आमदार देऊनही सांगली जिल्ह्याला मंत्रिमंडळात ठेंगा,महायुतीने घेतला सांगली जिल्ह्याशी पंगा !

पाच आमदार देऊनही सांगली जिल्ह्याला मंत्रिमंडळात ठेंगा,महायुतीने घेतला सांगली जिल्ह्याशी पंगा !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १६ डिसेंबर २०२
महाराष्ट्राच्या व उपमुख्यमंत्री पदाप्रमाणेच मंत्रिमंडळातील संभाव्य चेहऱ्यांची उत्सुकता आठवड्यापेक्षा जास्त ताणली गेली. अखेर काल संध्याकाळी महायुती मंत्रीमंडळाचा विस्तार करण्यात येऊन 39 आमदारांचा शपथविधी पार पडला. पण जेव्हा 39 मंत्र्यांमध्ये सांगलीचा एकही चेहरा दिसून आला नाही, तेव्हा महायुतीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांसह मतदारांच्या भुवया उंचावल्या. वास्तविक सुरेश खाडे व गोपीचंद पडळकर यांचे मंत्रिमंडळात वर्णी लागेल असे मानले जात होते. त्याचप्रमाणे सत्यजित देशमुख व सुहास बाबर यांचीही मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून संधी मिळेल असे बोलले जात होते. पण माहितीच्या नेत्यांनी विद्यमान मंत्रिमंडळात सांगली जिल्ह्यातील एकाही आमदाराचा समावेश केला नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

वास्तविक डॉ. सुरेशभाऊ खाडे यांनी मिरज विधानसभा मतदारसंघातून विजयी चौकार ठोकला आहे. तर सांगली विधानसभा मतदारसंघातून सुधीरदादा गाडगीळ यांनी विजयाची हॅट्रिक केली आहे. या दोघांपैकी किमान एकाला तरी या मंत्रिमंडळात संधी मिळेल अशी खात्री त्यांच्या कार्यकर्त्यांना होती. जतचे आमदार गोपीचंद पडळकर हे तर देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती मानले जातात. विधानसभा निवडणुकीच्या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी मतदारांना यावेळी जत तालुक्याचा दुष्काळ तर हटवूच, पण मंत्रिपदाचाही दुष्काळ हटवू, असा शब्द दिला होता. पण ते या शब्दाला जागले नाहीत, अशी भावना पडळकर यांच्या कार्यकर्त्यात निर्माण झाली आहे.


स्वातंत्र्यपूर्व काळापासून सांगली जिल्ह्याला एक मोठा इतिहास मान आहे. 64 वर्षाच्या कारकिर्दीत अपवाद वगळता, सांगली जिल्ह्याला नेहमीच मंत्रीपदाचा मान मिळाला आहे. दिवंगत नेते स्व. वसंतदादांनी तर चार वेळा मुख्यमंत्रीपद सांभाळले होते. महाआघाडीच्या काळात तर सांगली जिल्ह्याला चार चार मंत्री पदे लाभली होती. त्यांच्यानंतर आर. आर. आबा यांनी गृहमंत्री पद व जयंत पाटील यांनी अर्थमंत्री पद सांभाळले होते.

महायुतीच्या काळात आ. डॉ. सुरेश भाऊ खाडे यांना हमखास मंत्रीपद मिळाले होते. मंत्रिमंडळातील ते ज्येष्ठ मंत्री होते. तर आ. सुधीरदादा गाडगीळ यांचे भाजप व संघाच्या वरिष्ठ नेत्यांशी निकटीचे संबंध होते, असे असूनही त्यांना पुन्हा एकदा मंत्रीपदाने हुलकावणी दिली आहे.

आगामी काळात जिल्हा परिषदेसह सांगली महापालिका व नऊ नगरपालिकेसह, जिल्ह्यातील पंचायत समिती व काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने जिल्ह्यात उत्तुंग कामगिरी केल्याने भाजप मसह अजित दादांच्या राष्ट्रवादीतील व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीसाठी दंड थोपटले होते. विधानसभेप्रमाणेच मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या सांगली जिल्हा परिषदेवर पुन्हा एकदा भगवा फडकविण्यात रणशिंग फुंकले होते. त्याचप्रमाणे सांगली महापालिकेसह जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती व नगरपालिका, नगरपरिषद आणि ग्रामपंचायतीच्या आगामी निवडणुकीत महायुतीची सत्ता आणण्यासाठी दंड थोपटले होते.

मात्र जिल्ह्याला मंत्रीपद डावलून महायुतीने एक प्रकारे सांगली जिल्ह्यातील नेते व कार्यकर्त्यांना ठेंगा दाखवून मतदारांशीही पंगा घेतला आहे. आता आगामी निवडणुकीत नेते व कार्यकर्त्यांचा एक प्रकारे खच्चीकरण झाल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. आणि म्हणूनच या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदारही ठेंगा दाखवणार का ? अशी चर्चा सर्वत्र दिसून येत आहे.

दरम्यान आज शपथविधी झालेल्या मंत्र्यांना अडीच वर्षे मंत्रीपद देण्यात आली असून, उर्वरित अडीच वर्षासाठी ज्यांना या मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही, त्यांना संधी मिळणार आहे. त्यामुळे आता सांगली जिल्ह्याला पुढील अडीच वर्षे मंत्रीपदाची प्रतीक्षा करावी लागण्याची चिन्हे दिसत आहेत