yuva MAharashtra भगदाड शंभर फुटी रस्त्याला, रिकामी होतीय सांगली महापालिकेची तिजोरी; कायमस्वरूपी उपाययोजना गरजेची !

भगदाड शंभर फुटी रस्त्याला, रिकामी होतीय सांगली महापालिकेची तिजोरी; कायमस्वरूपी उपाययोजना गरजेची !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३१ डिसेंबर २०२
सांगलीतील छत्रपती शाहू महाराज शंभर फुटी मार्ग हा पूर्वेकडील उपनगरासह कोल्हापूरहून मिरजेकडे आणि तिथून सोलापुरकडे जाणाऱ्या वाहनधारकांसाठी सोयीचा... परंतु अगदी निर्मितीच्या काळापासूनच हा रस्ता नेहमीच वादाच्या केंद्रस्थानी राहिला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी या रस्ता हॉट मिक्स पद्धतीने तयार केला गेला. बऱ्याच वर्षांनी या रस्त्याचे व रस्त्याच्या आजूबाजूतील नागरिकांचे भाग्य उजळले. शंभर फुटी रस्त्यामागील मात्र समस्या आणि प्रश्न यांची सांगड मात्र सुटता सुटत नाही...

शंभर फुटी मार्गावरील कत्तलखाना चौक ते सिविल हॉस्पिटलकडे जाणारा चौक इथपर्यंतचा शंभर फुटी रस्ता, हा 100 फुटी आहे का ? सुरुवातीपासूनच येथील अतिक्रमणे कोणाच्या आशीर्वादाने वाढत आहेत ?... इथून सुरू झालेल्या प्रश्नांची मालिका नुकत्याच झालेल्या हॉट मिक्स रस्त्याचा दर्जा सक्षम यंत्रणे कडून तपासला गेला का ? काही सामाजिक संघटनांनी व कार्यकर्त्यांनी याबाबत सांगलीचे लोकप्रिय आयुक्त शुभम गुप्ता यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी स्वतः या परिसराची पाहणी केली. रस्त्याचा दर्जा व रस्ता शंभर फुटीटी की 80 ? या प्रश्नांची उत्तरे आजतागायत मिळू शकले नाहीत... 

आणि आता नवा प्रश्न उपस्थित होतो आहे तो, या मार्गासह सांगली मिरजेतील जुन्या ड्रेनेज पाईपलाईनचा... एखादा रस्ता नव्याने तयार करीत असताना, त्याखालील ड्रेनेज पाईप लाईन सुस्थितीत आहे का ? त्यावर वाढणारा रस्त्याचा व रस्त्यावरून येण्याजाणाऱ्या वाहतुकीचा भार ही ड्रेनेज लाईन पेलू शकेल का ? याचे उत्तर शोधण्याची गरज कोणालाच भासत नाही का ?...

सध्या सांगलीतील शंभर फुटी मार्गावरील अनेक ठिकाणी ड्रेनेज लाईन खचत असून, परिणामी लाखो रुपये खर्च करून तयार झालेल्या निधी खड्ड्यात जातो आहे. या खड्ड्याचा भार महापालिकेच्या तिजोरीवर पडत असून, होणाऱ्या नुकसानीस जबाबदार कोण हाही प्रश्न यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे. त्यामुळे आता सांगली मिरजेचे आमदार व प्रशासन यांनी प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या जनतेला याची उत्तरे देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.