| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २६ डिसेंबर २०२४
डॉ. एन. जे. पाटील यांना जाऊन ३५ वर्षे झाली.दि. २५ व २६जानेवारी १९७९ रोजी श्री. एम. व्ही. विरेंद्रकुमार यांच्या अध्यक्षतेखाली दक्षिण भारत जैन सभेचे ६५ वे अधिवेशन दावणगिरी येथे पार पडले. या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष श्री. टी. सुब्बाराव दावणगिरी हे होते. २६ जानेवारी रोजी ठराव नं. ९ ने स्व. डॉ. धनंजय गुंडे यांनी वीर सेवा दल स्थापनेचा ठराव मांडला. त्याला स्व. एन. जे. पाटील यांनी अनुमोदन दिले. हा ठराव मांडताना डॉ. गुंडे यांनी दक्षिण भारत जैन सभेच्या युवक सभेच्या अधिवेशनात चिंतनीय विचार मांडले. डॉ. एन. जे. पाटील आणि डॉ. गुंडे ही जैन समाजाची राम-लक्ष्मणाची जोडी. दोघांची घनिष्ठ मैत्री. प्रगतीचे संपादक प्राचार्य जी. के. पाटील यांनी प्रगतीमध्ये 'जैन समाज शेळ्या - मेंढ्यांचा झाला आहे काय? हा अग्रलेख २७.११.१९७८ ला लिहिला. त्यामध्ये त्यांनी जैन समाजातील युवा संघटनेला हाक दिली होती. तो लेख वाचून जैन समाजाच्या सर्वागीण विकासासाठी केवळ जैन समाजाचे नव्हे तर देशाचे नेतृत्व करणारे तरुण घडवले पाहिजेत. आणि दक्षिण भारत जैन सभेच्या ६५ व्या अधिवेशनात यावर विचार झाला पाहिजे असा लेख लिहिला होता. याचीच परिणिती वीर सेवा दल स्थापनेत झाली. वीर सेवा दलामुळे दक्षिण भारत जैन सभा नावारूपाला आली.समाजात कार्यकर्ते नेते यांची भक्कम फळी तयार झाली. याच फळीतील कार्यकर्त्यांनी दक्षिण भारत जैन सभेचे नेतृत्व केले. हे सारं डॉ. धनंजय गुंडे, डॉ. एन. जे. पाटील व वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांच्या परिश्रमाने घडले.
१९८२ पासून मी दक्षिण भारत जैन सभा, कोल्हापूर जैन बोर्डिंग व जैन श्राविकाश्रम कोल्हापूरच्या कार्यात सहभागी होत गेलो. १९८६ ते १९८८ या काळात डॉ. एन. जे. पाटील कोल्हापूर जैन बोर्डिंगचे सेक्रेटरी होते. जैन समाजातील गरीब मुलांबद्दल त्यांच्या मनात अतीव कणव त्यामुळे सेक्रेटरी झाल्याबरोबर त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांची रयत मधील कमवा आणि शिका योजना बोर्डिंग मध्ये सुरू केली. दरवर्षी पाच विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश व त्यांचा भोजन खर्च बोर्डिंग मार्फत केला. यासाठी विशेष देणग्या गोळा केल्या. या काळात त्यांनी कोल्हापूर जैन बोर्डिंगच्या जुन्या इमारतीच्या ज्या खोली नं. ७ मध्ये कर्मवीर भाऊराव पाटील विद्यार्थी दशेत रहात होते. त्यांची प्रेरणा मिळावी म्हणून खोली नं. ७ला 'हिच ती खोली जेथे कर्मवीर भाऊराव पाटील रहात होते असा फलक लावून कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली.
डॉ. एन. जे. पाटील हे सेवाभावी, स्वच्छ आणि पारदर्शक कारभार करणारे बोर्डिंग सेक्रेटरी होते. मी बोर्डिंगचा लिपिक होतो. त्यांनी बोर्डिंग कार्यकारी मंडळाचा मासिक हिशोब मिटींग नोटीसीच्या मागे जमाखर्च तपशिलासह चक्रमुद्रीत करुन सभासदांना पाठवायची प्रथा सुरु केली. बोर्डींगच्या डेडस्टाॅक फर्निचरची मोजदाद करवून घेतली. बँक शिल्लक व रोख शिल्लक वरचेवर तपासायचे. त्यामुळे बोर्डिंग कार्यकारी मंडळ त्यांच्यावर खूष झाले. अधेमधे मेसला भेट देऊन जेवणाचा दर्जा तपासायचे.. विद्यार्थ्यांच्या खोलीत जाऊन अभ्यासाची चौकशी करायचे.
दरवर्षी बोर्डिंग मध्ये होणाऱ्या वीर सेवा दल नेतृत्व प्रशिक्षण शिबिराला भेट देऊन चौकशी करायचे. ते म्हणाले, 'मी वैद्यकीय क्षेत्रातील माणूस पण बोर्डिंगचा हिशोब, जमाखर्च, प्रोसिडींग, अभिलेख व्यवस्थित ठेवण्याचे काम लिपिक म्हणून नेमगोंडा तू केलस म्हणून मी सेक्रेटरी म्हणून चांगले काम करु शकलो. तू हुशार आणि प्रामाणिक आहेस, तुला मी रत्नाकर बँकेत असिस्टंट डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून घ्यायचे ठरवले आहे. दुसऱ्या दिवशी मला त्यांच्या दवाखान्यात बोलावून ऑर्डर दिली. मी बोर्डिंगवर आलो. दुसऱ्या दिवशी मला वेटींगमधून स्व. लठ्ठे साहेबांनी स्थापन केलेल्या श्रीमती ताराराणी अध्यापक महाविद्यालय या शासकीय बी. एड. काॅलेजात प्रवेश मिळाल्याचे पत्र आले. तातडीने मी डॉ. एन. जे. पाटील यांना भेटून त्यांचे आभार मानले व मला शिक्षक व्हायचे आहे. मी बी. एड. करणार असे सांगितले. काय हरकत नाही. रत्नाकर बँकेला एक तुझ्या सारखा चांगला अधिकारी मिळावा म्हणून आणि तुला चांगल्या कामाचे बक्षीस म्हणून असिस्टंट डेव्हलपमेंट ऑफिसरची नोकरी देऊ केली होती. आता बी. एड. हे दिवसभर असणार..बोर्डिंगचे लिपिक म्हणून काम करता येणार नाही. लिपिक दुसरा नेमतो. तू फक्त संध्याकाळी एक तास येऊन अंतर्गत तपासणीस म्हणून काम कर. तुझा पगार चालू राहील आणि बी. एड. पूर्ण होईल. आणि अशा तर्हेने मी बी. एड. झालो.
माझी शिवाजी विद्यापीठात एम. ए. ची. परीक्षा असताना ते दररोज मला फियाट गाडीतून सोडायला यायचे.
वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे आजारी पडल्यानंतर पहिल्यांदा त्यांना डॉ. एन. जे. पाटील कार्यरत होते त्या राजारामपुरीतील आशा नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळी वीराचार्य बाबासाहेब यांच्या लूनावरुन मी त्यांना दोन्ही वेळा भोजन पोहोच करायचो. डॉ. एन. जे. पाटील त्यांची खूप काळजी करायचे. वीराचार्य बाबासाहेब यांच्यावर त्यांचा जीव होता. रत्नाकर बँकेच्या माध्यमातून डॉ. धनंजय गुंडे आणि डॉ. एन. जे. पाटील यांनी खूप मदत केली आहे. २२ मे १९८३ रोजी कोल्हापूरात वीर सेवा दलाची भव्य व्यसनमुक्ती दिंडी निघाली. त्यासाठी डॉ. गुंडे, डॉ. एन. जे व मी असे तिघे शाहुपुरी व राजारामपुरीतील व्यापाऱ्यांच्या दुकानात जाऊन दोन लाख सत्तावीस हजार रुपये देणगी दाखल जमवले होते. खर्च वजा जाता शिल्लक पावणे दोन लाख रुपये पाठशाळा फंड म्हणून रत्नाकर बँकेत एफ. डी. केली. कर्मवीर मल्टीस्टेट पतसंस्था जयसिंगपूर या संस्थेच्या जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. वीर सेवा दलाच्या सर्व उपक्रमांना ते भरभरून मदत करायचे. प्रारंभीच्या काळात वीर सेवा दलाच्या शाखा सुरु करण्यासाठी ते व डॉ. गुंडे पदरमोड करुन यायचे. वीर सेवा दलाचा अध्यक्ष म्हणून त्यांनी वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांच्या नंतर अत्यंत कठीण काळात संघटनेला आधार दिला होता. आता असे संवेदनशील नेते कमी होत चालले आहेत. अशा नेत्यांचा सुकाळ निर्माण होणे हेच खरे डॉ. एन. जे. पाटील यांना त्यांच्या स्मृतीदिनी खरे अभिवादन ठरेल
प्रा. एन.डी.बिरनाळे
महामंत्री (सांगली)
दक्षिण भारत जैन सभा