| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ३० डिसेंबर २०२४
अभिनेत्री प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. सागर बंगल्यावर जाऊन प्राजक्ता माळी देवेंद्र फडणवीस यांना भेटली आहे. या भेटीवेळी प्राजक्ता माळीने फडणवीसांना निवेदनही दिलं.मुख्यमंत्र्यांच्या भेटीला प्राजक्ता माळीसोबत तिचं कुटुंबही उपस्थित होतं. सुरेश धस यांनी माफी न मागितल्यामुळे प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.
प्राजक्ता माळी यांच्या सन्मानाला बाधा येईल, असं कुठलंही कृत्य खपवून घेणार नाही, त्यावर कारवाई केली जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्राजक्ता माळीला दिलं आहे. युट्युबवर काही लोक आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित करतात, अशी तक्रारही प्राजक्ता माळीने मुख्यमंत्र्यांकडे केली, त्यावरसुद्धा कारवाई करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.
भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर टीका करताना अभिनेत्री प्राजक्ता माळीचं नाव घेतलं, यानंतर प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेऊन सुरेश धस यांना प्रत्युत्तर दिलं. तसंच सुरेश धस यांनी माफी मागावी, अशी मागणी प्राजक्ता माळीने केली. याशिवाय प्राजक्ता माळीने महिला आयोगाकडे सुरेश धस यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.