| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १६ डिसेंबर २०२४
सांगली जिल्ह्याची साखर सम्राटांचा पट्टा म्हणून स्वतंत्र ओळखला जातो. जिल्ह्यात सतरा साखर कारखाने आहेत. सहाजिकच येथे ऊस लागवडीचे क्षेत्रही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे आपसूकच ऊसतोड आणि त्यासाठी लागणारे ऊसतोड मजूरही आलेच. या ऊसतोड मजुर ऊस उत्पादकांकडून जादाचे पैसे घेतल्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर सध्या होत आहे. परंतु हे ऊसतोड मजूर ज्यादा चे पैसे का घेतात ? त्यांची मजबुरी वर्षानुवर्षे होणारा संघर्षमय जीवन प्रवास याचीही चर्चा व्हायला हवी.
निसर्गाची नेहमीच अवकृपा असलेल्या बीड, धाराशिव, अहमदनगर तसेच सांगली जिल्ह्यांतील काही तालुक्यांतूनही ऊसतोड हे मजूर आपल्या कुटुंबासह ऊस तोडणीसाठी या जिल्ह्यात येत असतात. भल्या पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत यांचे ऊस तोडणीसाठीचे हे काम सुरू असते. सदर ऊसतोड मजुरांना त्यांच्या कुटुंबातील महिलावर्गाचीही यासाठी मोठी साथ मिळते. उसाच्या फडात वाडे बांधणीचेही कामही त्या करत असतात.
लहान-लहान लेकरांना बरोबर घेऊन शेतातच बांधावर साडीच्या छोट्याशा झोळीत त्यांचा सांभाळ होत असतो. त्यांच्या लेकरांना ऊन, वारा, काट्याचे भय कधी वाटतच नाही. वर्षातील सहा महिने हे मजूर गावी तर सहा महिने कारखान्यावर जात असल्याने मुलांच्या शिक्षणाची मात्र यामध्ये मोठी परवडच होत असते. त्यांना महामंडळ स्थापन करून त्याचा लाभ कधी मिळणार, हे प्रश्न अधांतरीच राहिले आहेत.
ऊसतोड कामगार हे शासन, साखर कारखानदार व मुकादमांकडून दुर्लक्षित आहेत. ऊसतोड कामगारांच्या कामाचे मूल्यांकन होत नाही. त्यांना आठवडी सुटी नाही, वैद्यकीय सुविधा नाहीत. अनेकांना लहान-सहान दुखापत तर होतेच शिवाय कित्येकांचा साप चावल्यामुळे मृत्यू झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. ऊसतोड कामगारांच्या व्यथा समजावून घेऊन यावर कायमस्वरूपी उपाययोजना होणे आवश्यक आहे.