| सांगली समाचार वृत्त |
कवठे महांकाळ - दि. १५ नोव्हेंबर २०२४
निवडणूक निकालानंतर 24 तारखे पासून मला माझं रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटील यांची गुंडशाही मोडीत काढल्या शिवाय राहणार नाही, असा निर्धार तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघाचे उमेदवार रोहित पाटील यांनी व्यक्त केला आहे. रोहित पाटील यांच्या समर्थनार्थ शरद पवार यांची सभा पार पडली. या सभेत बोलताना रोहित पाटील यांनी संजय पाटील यांच्यावर जोरदार तोफ डागली.
रोहित पाटील म्हणाले की, तासगावमधील माझा विजय काळ्या दगडावरील पांढरी रेष आहे. मटण खाऊन उपोषण केलं असं संजय काका पाटील भाषणात टीका करतात, पण हे सर्व जनतेला माहीत आहे. त्यांनी सांगितले की, एका महाशयाने नऊ दिवस उपोषण करून दहाव्या दिवशी डॉल्बीवर नाचले होते. ते सकाळी दुध प्यायचे आणि दुपारी घरी जेवायला जायचे. हेही सर्वांना माहीत असल्याची टीका त्यांनी केली.
रोहित पाटील म्हणाले की, संजयकाका सर्वत्र रोहित पाटील, रोहित पाटील करत आहेत कदाचित त्यांच्या स्वप्नात देखील रोहित पाटीलच दिसत असेल. तासगावमध्ये माझ्या खर्चातून स्टेज मारतो. एका स्टेज वर येऊ आणि तुम्ही तुमची कामे सांगा मी माझी कामे सांगतो, असे आव्हान त्यांनी दिले. सर्व विरोधक एकत्र होऊन मला एकट पडण्याचं काम केलं जातं असल्याचे ते म्हणाले.
त्यांना सत्ता हवी असेल तर त्यांना आपण ग्रामपंचायतीची सत्ता देऊ - विशाल पाटील
खासदार विशाल पाटील यांनीही जोरदार तोफ डागली. ते म्हणाले की, वय कमी असताना वडील वारल्याने रोहित पाटील यांना किती अडचणी आल्या असतील याचा विचार करा. 9 वर्षात तासगाव बरोबरच महाराष्ट्रामध्ये नावलौकिक मिळवण्याचे काम रोहित पाटील यांनी केले. संजय काका पाटील येवढे सत्तेसाठी हपापलेले आहेत, की स्वतःच्या पोराला बाजूला सारून ते निवडणूक लढण्यासाठी आले. त्यांना सत्ता हवी असेल तर त्यांना आपण ग्रामपंचायतीची सत्ता देऊ. बाहेरील मतदार आणून तासगावमधील निवडणूक केली जात आहे. तासगाव कवठेमहांकाळमध्ये घासून निवडणूक करायची नाही, पण ठासून निकाल लागला पाहिजे, असेही विशाल पाटील म्हणाले. विरोधकानी मतदारांना गोंधळात घालण्यासाठी पक्ष बदलून घड्याळ चिन्ह घेतले असल्याची टीका विशाल पाटील यांनी केली.