| सांगली समाचार वृत्त |
रहाता - दि. १५ नोव्हेंबर २०२४
बाळासाहेब थोरातांना निर्णयाचे आता अधिकार द्यायला हवेत. त्यांच्या हातात राज्य दिले तर अनेक प्रश्न सुटण्यास मदत होईल, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. महाविकास आघाडी सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण? यावरून बरीच चर्चा झाली. या पार्श्वभूमीवर शिर्डी मतदारसंघातील काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी आयोजित सभेत पवार यांनी थोरात यांचे कौतुक केले. व्यासपीठावर थोरातही उपस्थित होते.
पवार म्हणाले, शेतीचे प्रश्न सोडवायचे असतील तर थोरातांना तुम्ही आता निर्णयाचे अधिकार द्यायला हवेत. मी काही विधानसभेत जाणार नाही. थोरात तेथे आहेत. राज्याचा कृषिमंत्री म्हणून देशातील इतर कृषिमंत्र्यांच्या तुलनेत त्यांनी सर्वोत्तम काम केले. पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव तालुक्यातही शरद पवार यांच्या सभा झाल्या. ज्यांनी साथ सोडली त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
आमच्या भाषणावर बंदीची शक्यता : थोरात
आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले, प्रभावती घोगरे व माझ्यावर लवकरच भाषणबंदी येणार असल्याची शक्यता आहे. तशा हालचाली निवडणूक आयोगाकडे सुरू झाल्या आहेत. या भागात गुलामीचे राजकारण चालू आहे.
दरम्यान शरद पवार यांनी एका अर्थी मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून बाळासाहेब थोरात यांचे नाव पुढे केले आहे का ? मग खुद्द त्यांच्या राष्ट्रवादीतील मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक असलेल्या अथवा उद्धव ठाकरे यांच्या स्वप्नांचे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. अर्थात शरद पवार हे जे बोलतात त्यामागे अनेक अर्थ लपलेले असतात, हे आज पर्यंत त्यांच्या राजकीय कारकीर्दीतील वैशिष्ट्य आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री म्हणून बाळासाहेब थोरात यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा नेमका अर्थ राजकीय विश्लेषक आणि विकास आघाडीचे नेते शोधू लागले आहेत.