| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २५ नोव्हेंबर २०२४
आपण अनेकदा वृत्तपत्रात वाचतो, किंवा टीव्हीवर बातमीपत्रात ऐकतो की संशयित आरोपीची नार्को टेस्ट करावी अशी मागणी त्याच्या विरोधी बाजूच्या संबंधितांनी केली आहे... एखाद्या गंभीर प्रकरणात गुन्हेगार जर चौकशीत सहकार्य करत नसेल तर त्याची नार्को टेस्ट करण्याची आणि त्यामाध्यमातून सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो. यासाठी संबंधित न्यायालयाची परवानगी मिळवणे गरजेचे असते. जर न्यायालयाने परवानगी दिली आणि आरोपीचीही त्यासाठी कोणती तक्रार नसेल, तरच ही टेस्ट घेता येते. नार्को टेस्ट फॉरेन्सिक एक्सपोर्ट, तपास अधिकारी, डॉक्टर आणि मानसशास्त्रज्ञ यांच्या उपस्थितीत घेतली जाते.
नार्को टेस्ट कशी घेतली जाते ?
१) नार्को विश्लेषण टेस्ट करत असताना आरोपीच्या शरीरात इंजेक्शनद्वारे ‘सोडियम पेंटोथल' हे औषध सोडले जाते. हे औषध शरीरात जाताच आरोपी बेशूद्धवस्थेत जातो, त्याचे आत्मभान आणि कल्पना करण्याची क्षमता खुंटते. त्यामुळे या अवस्थेत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना आरोपीला खोटं बोलणं अवघड होऊन जातं.
२) औषधामुळे आरोपी संमोहन अवस्थेत असल्यामुळे त्याला खोटं बोलता येत नाही, त्यामुळे यावेळी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं खरी असल्याचं मानलं जातं.
३) ‘सोडियम पेंटोथल' हे औषध शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाला भूल देण्यासाठी वापरलं जातं. या औषधाला 'ट्रूथ ड्रग' असंही म्हटलं जातं.
४) सर्वोच्च न्यायालयाने २०१० साली दिलेल्या निकालानुसार, आरोपीच्या संमतीशिवाय नार्को विश्लेषण चाचणी घेतली जाऊ शकत नाही. नार्को टेस्टला कायदेशीर वैधता असली तरी कोणत्या परिस्थितीत अशा चाचणीला परवानगी द्यायची याचा निर्णय न्यायालयाकडूनच घेतला जातो.
५) भारतात २००२ साली गुजरातमध्ये झालेल्या गोंध्रा हत्याकांडानंतर या गुन्ह्यातील आरोपींची नार्को टेस्ट घेण्यात आली होती. त्यानंतर स्टॅम्प पेपर घोटाळ्यातील आरोपी अब्दुल करीम तेलगीची नार्को चाचणी २००३ साली पार पडली. निठारी हत्याकांडातील दोन आरोपींचीही गुजरातच्या गांधीनगरमध्ये नार्को चाचणी करण्यात आली होती.
नार्को टेस्टआधी घेतली जाते काळजी ?
नार्को टेस्ट घेण्याआधी संबंधित आरोपीची शारीरिक तपासणी केली जाते. ज्या आरोपीची सदर चाचणी करायची आहे, ती व्यक्ती वृद्ध आहे का किंवा शारीरिक व्याधींनी ग्रस्त आहे का? याचा तपास केला जातो. तसेच आरोपी मानसिकदृष्ट्या दुर्बल तर नाही ना? याचाही तपास घेतला जातो. औषधाच्या डोसचा कमी-अधिक होणाऱ्या परिणांमाचाही विचार डॉक्टर करत असतात.