yuva MAharashtra सांगलीत काँग्रेस संपू देणार नाही, पृथ्वीराज पाटील यांनी वसंतदादांच्या समाधीवर माथा टेकवून घेतली शपथ !

सांगलीत काँग्रेस संपू देणार नाही, पृथ्वीराज पाटील यांनी वसंतदादांच्या समाधीवर माथा टेकवून घेतली शपथ !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ५ नोव्हेंबर २०२
सांगली विधानसभा मतदार संघात गेली पंधरा वर्षे काँग्रेसचा आमदार नाही. हे चित्र बदलायला काँग्रेसच्या विचाराचा प्रत्येक मतदार, कार्यकर्ता सज्ज असताना काही अनपेक्षित घडले आहे. मतदार सुज्ञ आहेत. जे घडतेय, ते का, कसे, कशासाठी, याची त्यांना पूर्ण कल्पना आहे. मी वसंतदादांच्या समाधीवर शपथ घेऊन आलोय. मी सांगलीत काँग्रेस संपू देणार नाही, असा विश्वास काँग्रेसचे सांगली विधानसभा मतदार संघाचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.  


पृथ्वीराज पाटील यांनी सायंकाळी कृष्णा नदीकाठावर वसंतदादांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘दहा वर्षांपूर्वी माझ्याकडे काँग्रेसचा पदाधिकारी म्हणून जबाबदारी आली तेंव्हा काँग्रेसचा कठीण काळ सुरु झाला होता. त्यावेळी वसंतदादांच्या विचाराने वाढलेली काँग्रेस पुढे न्यायची, हाच निर्धार होता. चहूबाजूंनी संकट असताना, भाजपकडून सुडाचे राजकारण होत असताना त्याविरोधात उभे राहिलो. काँग्रेस विचाराचा प्रत्येक कार्यकर्ता ताकदीने लढला. तो कोणत्याही आमिषाला बळी पडला नाही. असे यावेळेस बोलताना पाटील म्हणाले.


दहा वर्षे काँग्रेससाठी सारे मिळून झटले. आज समज-गैरसमजातून जे काही घडले आहे, त्यावर नक्की फेरविचार होईल. काँग्रेस एकसंध राहील, असा मला अजूनही विश्वास आहे. असे सांगून पृथ्वीराज पाटील म्हणाले की, आमचे नेत डॉ. विश्वजीत कदम, खासदार विशाल पाटील यांची पूर्ण ताकद सोबतीला उभी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडातील सर्व घटकपक्ष सोबत आहेत. अनेक सामाजिक संघटनांनी मला साथ दिली आहे. मी दादांच्या समाधीवर मी शपथ घेऊन आलोय, जिंकल्यानंतर आधी दादांच्या समाधीवर डोके ठेवेन आणि मगच गुलाल उधळेन.’’

ते पुढे म्हणाले की, ‘‘काँग्रेसमध्ये फूट पडली असे समजून भाजप खूष होत असेल तर त्यांनी स्वप्नातून बाहेर यावे. त्यांनी दहा वर्षे सांगली खड्ड्यात घातली. कार्पोरेट राजकारण केले. राज्यात सत्ता असताना त्यांना सांगलीत बदल घडवता आला नाही. तो घडवायचा असेल तर बदल घडला पाहिजे, याची जाणीव मतदारांना आहे. त्यांच्यासमोर आम्ही ताकदीने जाऊ.’’ असेही यावेळी बोलताना पृथ्वीराज पाटील म्हणाले.