yuva MAharashtra पृथ्वीराजबाबा खरंच तुम्ही चुकलात !... आयुष्यातील दहा वर्षे विनाकारण खर्ची घातलीत !... तुमच्या कष्टाचे चिज झाले का हो ?...

पृथ्वीराजबाबा खरंच तुम्ही चुकलात !... आयुष्यातील दहा वर्षे विनाकारण खर्ची घातलीत !... तुमच्या कष्टाचे चिज झाले का हो ?...


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २४ नोव्हेंबर २०२
काँग्रेस पक्षाचे उमेदवार आणि सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराजबाबा पाटील यांचा सांगली विधानसभा मतदारसंघातून काल पुन्हा एकदा पराभव झाला. पण हा पराभव त्यांच्यापेक्षा सच्च्या काँग्रेस प्रेमींच्या जिव्हारी लागला. पृथ्वीराजबाबा खरंच तुम्ही चुकलात !... आयुष्यातील दहा वर्षे विनाकारण खर्ची घातलीत !... आणि हे करूनही तुमच्या कष्टाचे चिज झाले का हो ?... असा प्रश्न प्रामाणिक काँग्रेस कार्यकर्त्यातून विचारला जात आहे.

तुम्ही तब्बल दहा वर्षे सांगली विधानसभा मतदारसंघातच नव्हेत तर संपूर्ण जिल्ह्यात तुमचे कार्य उल्लेखनीय आहे. अडचणीच्या काळात अनेकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलात. प्रसंगी पदरमोड करून कित्येकांना आर्थिक मदत केलीत. यावेळी तुम्ही ना जात पाहिलीत, ना त्यांचा पक्ष... आणि मग, मतदान केंद्रात मतदान यंत्राचे बटन दाबताना यापैकी कोणालाच तुमची आठवण आली नाही का हो ? नसेल तर का ? आणि आली असेल तर मग तुमच्या नावासमोरील बटन त्यांनी का नाही दाबले ? असे कोणते कारण होते की आठवण येऊनही त्यांनी मतदान यंत्रावरील तुमच्या नावासमोरील बटन दाबले नाही ? काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक आंदोलनात तुम्ही आघाडीवर होतात. जिल्ह्यात पायपीट केलीत. शासकीय पेन्शनधारक असोत की गरीब रिक्षा चालक, त्यांच्या आंदोलनात सहभागी झालात. त्यांचा आवाज बनलात. आणि मग अशांची संख्या केवळ 76 हजारच आहे का  ? 

गेली पाच वर्षे तर तुमच्या सामाजिक कार्यातील कष्टाला तोड नाही. अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती सांगलीत उभारून तुम्ही भाविकांना येथेच श्रीरामाचे दर्शन घडविले. सांगलीतील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर अखंड ज्योत तेवत ठेवून, तरुणांच्या हृदयात हिंदुत्व जागवलेत. यावेळी तुमच्या मनात अन्य कोणताही भाव नव्हता. केवळ होते ते राष्ट्रप्रेम. पण, पण, पण...


मागील लोकसभा निवडणुकीच्या वेळी तुम्ही विशाल पाटील यांचा प्रचार केलात. पण पक्षनिष्ठा जागृत ठेवून. त्यामुळे तुम्हाला उघडपणे त्यांचा प्रचार करता आला नाही. याची सर्वसामान्य कार्यकर्त्यांना जाण होती. पण, पण  पण... गेल्या दहा वर्षात तुम्ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बळ दिलेत, त्यांच्या मनात काँग्रेसचा विचार जागृत ठेवलात. समाजात तुम्ही काँग्रेस पक्षाचे विचार विविध माध्यमातून जागृत ठेवलेत. पण, पण, पण...

का केलेत इतके सारे ?... केवळ विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ?... ज्यांच्या मनात हा विचार येईल, तो काँग्रेस प्रेमी म्हणावा का हाच प्रश्न आहे. ज्या खऱ्या काँग्रेस प्रेमींना आणि जनतेला तुमच्या कष्टाची, धडपडीची, प्रामाणिकपणाची जाणीव होती- आहे, त्यांनी तुम्हाला भरभरून मते दिली. या साऱ्यांना धन्यवाद दिलेच पाहिजेत. पण ही मते तुम्हाला विजयाप्रत घेऊन जाण्यासाठी कमी पडली. पण त्यांचे मोल मात्र अनमोल आहेत...

फक्त एक मात्र खरं... तुमच्या आजूबाजूला जी मंडळी होती, त्यांच्याकडे तुम्ही फक्त आणि फक्त प्रामाणिकपणाच्या नजरेतूनच पाहिलेत. मात्र यापैकी किती जण तुमच्यासाठी प्रामाणिकपणे राबलेत ? हे प्रश्नचिन्ह खरोखरच जे कार्यकर्ते तुमच्यासाठी राबले, त्यांच्या मनात उभे राहिले आहे. तुम्ही सर्वांना जवळ केलेत, पण यापैकी केवळ शरीराने किती जण तुमच्याजवळ होते, आणि किती जण मनाने... ही शंका आल्याशिवाय राहत नाही...

सर्वात शेवटी पण अतिशय महत्त्वाचं... 
श्रीमती जयश्रीताई पाटील यांनी बंडखोरी केली. ठीक आहे. ही त्यांची इच्छा... केव्हा त्यांच्याच मताप्रमाणे कार्यकर्त्यांची... पण यामुळे नुकसान कोणाचे झाले ?... त्यांच्या पदरात काय पडले ? हा विचार आता जयश्रीताईंनीही करावा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनीही...