| सांगली समाचार वृत्त |
मिरज - दि. २० नोव्हेंबर २०२४
आपल्याकडे दानाला खूप महत्त्व आहे. प्रत्येकजण आपापल्या परीने दान करीत असतो. अलीकडे देहदान आणि अवयव दान हेही श्रेष्ठ मानले जाते. असेच एक दान खूप महत्त्वाचे आहे. जगातील सर्वात मोठी म्हणून गौरविलेल्या लोकशाहीला बळकट करण्याचे काम हे दान करीत असते. अर्थात मतदान !...
हे दान करता यावे म्हणून शासन प्रशासन निवडणुकीच्या काळात अतोनात कष्ट घेत असतात. मतदान करता यावे म्हणून या दिवशी शासकीय सुट्टी ही जाहीर करण्यात येते.पण आपल्याकडे एक वर्ग असा आहे, जो हे दान देण्यासाठी हात आखडता घेतो. काही महाभाग तर ही सुट्टी 'एन्जॉय' करण्यासाठी जातात. तर काही जण घरीच बसून 'एन्जॉय' करतात. काही ना मतदान म्हणजे वेळ व्यर्थ घालवणे वाटते.
आशा साऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालण्याचा प्रकार मिरजेत पहावयास मिळाला. येथील मंगलताई हिंगमिरे या वयस्क महिला. यांना कोरोनाच्या काळात त्रास झाला आणि त्यांचे फुफ्फुस निकामी झाले. 24 तास त्यांना कृत्रिमरित्या ऑक्सिजन द्यावा लागतो. पण लोकशाही बळकट करण्याची या प्रक्रियेसाठी मतदानाचे महत्त्व त्या जाणत असल्यामुळे, त्यांनी आपल्या मुलाला 'आपण मतदानासाठी जायचे' असे सांगितले. मुलाने याकडे आईच्या तब्येतीच्या कारणास्तव थोडेसे दुर्लक्ष केले. पण मंगलताईंनी मतदानासाठी हट्टच धरला.
तेव्हा ऑक्सिजन सिलेंडरसह घेऊन ही मंडळी मतदान केंद्रावर पोहोचली. आणि मंगलताईंनी आपल्या मुलाच्या मदतीने मतदानाचा हक्कही बजावला. तेव्हा उपस्थितांमधून मंगलताईंवर कौतुकाचा वर्षाव झाला.
मतदानाचा दिवसाची सुट्टी 'एन्जॉय' करण्यासाठी घालवणाऱ्या तेव्हा काय करायचे मतदान करून ? असे म्हणणाऱ्यांना मंगल ताई म्हणजे एक आदर्श ठराव्यात. आणि किमान यापुढे तरी त्यांना मतदान करण्याची संबधी मिळावी. राजकीयदृष्ट्या 'मिरज पॅटर्न' हा शब्द आपल्या परिसरात रूढ आहे. पण हा आगळावेगळा महत्त्वपूर्ण 'मिरज पॅटर्न' सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.