| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २० नोव्हेंबर २०२४
दसरा, दिवाळी आणि आता विधानसभा निवडणुकी एकापाठोपाठ आल्याने जिल्ह्यात रक्त पिशव्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. दोन महिन्यांत एकही रक्तदान शिबिर न झाल्याने गरजवंत कुटुंबांवर रक्तदाते शोधण्याची वेळ आली आहे. ऐच्छिक रक्तदाते कमी झाल्याने ही परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे.
'रक्तदान श्रेष्ठदान' हे ब्रीद घेऊन या क्षेत्रात विविध सामाजिक संस्था काम करत आहेत. जिल्ह्यात १६ रक्त संकलन केंद्रे आहेत. एकेक केंद्राकडून दर महिन्याला २५० ते ३०० रक्त पिशव्यांचे संकलन केले जाते. निमित्त शोधून रक्तदान शिबिरे भरवली जातात.
समाजसेवक, खेळाडू, मंडळे, राजकारण्यांकडून शिबिरांचे आयोजन केले जाते. मात्र, दसरा, दिवाळी, त्यानंतर आलेली विधानसभा निवडणूक. त्यामुळे दोन महिन्यांपासून रक्तदान शिबिरे झालेली नाहीत. निवडणूक काळात रक्तदान शिबिरांना बंदी नसते. मात्र कार्यकर्त्यांची कमतरता असल्याने शिबिरांचे आयोजन झालेले नाही.
सगळेच कार्यकर्ते निवडणुकांमध्ये गुंतले आहे. महाराष्ट्रात निवडणुका असल्याने कर्नाटकात डॉ. शिरगावकर रक्त संकलन केंद्रातर्फे अथणी (कर्नाटक) येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, तिथेही तुटवडा निर्माण झाल्याने परवानगी नाकारण्यात आली आहे.
रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी रुग्णालयातर्फे रुग्णांच्या नातेवाईकांनाच विनंती केली जात आहे. नातेवाईक रक्तदाते शोधून आणत आहेत. रुग्णाला गरज असलेल्याच नव्हे, तर कुठल्याही रक्तगटाच्या पिशव्या स्वीकारल्या जात आहेत. त्या आवश्यकतेनुसार अन्य रुग्णांना दिल्या जात आहेत. यामुळे रक्त तुटवड्यावर मात करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
रक्तदात्याला भेटवस्तूंचे आमिष !
रक्तदान हे श्रेष्ठदान असल्याने त्याची किंमत होऊ शकत नाही, तरीही काही आयोजकांकडून शिबिरांच्या माध्यमातून रक्तदात्याला भेटवस्तूचे आमिष दिले जात आहे. जो भेटवस्तू देईल, त्याच्याच शिबिराला गर्दी होते. तसेच काही आयोजक रक्त संकलन केंद्र चालकांना आमचे काय, अशीही विचारणा करत आहेत. त्यामुळे या क्षेत्रात प्रामाणिक काम करणाऱ्यांची गैरसोय होत आहे.
जिल्ह्यात रक्त पिशव्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. आवश्यकतेनुसार रुग्णांच्या नातेवाईकांनाच रक्तदाते मिळवून देण्याची विनंती केली जात आहे. रक्तदान शिबिरे वाढवण्यासाठी समाजातील सर्वच घटकांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.
- उज्ज्वल तिळवे,
डॉ. शिरगावकर रक्त संकलन केंद्र