yuva MAharashtra मराठा समाज विधानसभा निवडणुकीत राहणार तटस्थ, वैयक्तिक पातळीवर निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य !

मराठा समाज विधानसभा निवडणुकीत राहणार तटस्थ, वैयक्तिक पातळीवर निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १५ नोव्हेंबर २०२
विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाच्या कोणत्याही संघटनेने अथवा व्यक्तीने कोणत्याही उमेदवाराला मराठा समाज म्हणून पाठिंबा देऊ नये असा निर्णय सांगलीत समाजाच्या बैठकीत झाला. बैठकीला पद्माकर जगदाळे, नितीन चव्हाण, सतीश साखळकर, अतुल माने, शरद देशमुख आदी उपस्थित होते.

मराठा नेते मनोज जरांगे-पाटील यांनी समाजाने पाडापाडीची भूमिका घ्यावी असे आवाहन केले आहे. त्यावर चर्चेसाठी गुरुवारी बैठक झाली. यावेळी पद्माकर जगदाळे म्हणाले, सर्वच पक्षांमध्ये व अपक्षांसोबत मराठा समाजबांधव कार्यरत आहेत. पण जरांगे -पाटील यांनी निवडणुकीचा विषय डोक्यातून काढला आहे. महाविकास आघाडी, महायुती किंवा अपक्ष यापैकी कोणालाही पाठबळ दिलेले नाही असे स्पष्ट केले आहे. समाजाने स्वतः विचार करून निर्णय घ्यावा असेही सांगितले आहे. सांगलीत म्हणून एखाद्या उमेदवाराला पाठिंबा देऊन समाजात फूट पडू नये अशी भूमिका आहे. त्यामुळेच समाज कोणालाही पाठिंबा देणार नाही.


स्वत:च्या इच्छेनुसार काम करा

पद्माकर जगदाळे म्हणाले, समाजातील विविध संघटना, कार्यकर्ते यांनी समाजाच्या नावाने कोणालाही पाठिंबा देऊ नये. समाजाचा नेता म्हणून प्रचारही करू नये. वैयक्तिक पातळीवर स्वइच्छेनुसार काम करावे, पण ती समाजाची भूमिका आहे असे सांगू नये. एखाद्याने समाजाच्या नावाने पाठिंबा जाहीर केला, तर तो निर्णय सकल मराठा समाजाला मान्य नसेल.

बैठकीला विजय साळुंखे, विजय पाटील, शिवाजी मोहिते, उदय जाधव, सच्चिदानंद कदम, विश्वजीत पाटील, प्रवीण पाटील, उदय पाटील, राहुल पाटील, ऋषिकेश पाटील, चंद्रकांत सूर्यवंशी, ॲड. भाऊसाहेब पवार, राजेश जगदाळे, विकास सूर्यवंशी, उमेश चव्हाण, भरत कुबडगे, शिवप्रसाद पाटील यांच्यासह मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.