Sangli Samachar

The Janshakti News

खा. प्रणिती शिंदे सांगली जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीतील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १ ऑक्टोबर २०२४
महाराष्ट्रातील आघाडी विधानसभा निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता असून सर्वच राजकीय पक्षांनी यासाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणे, त्यामधून निवडून येण्याची शंभर टक्के खात्री असलेल्या उमेदवारांची निवड करणे, मतदार संघातील बूथ कमिट्या स्थापन करणे, मतदारांशी संपर्क साधण्यासाठी बुथनिहाय कार्यकर्त्यांना जबाबदारी देणे, अशा महत्त्वाच्या पातळीवर निर्णय घेण्यासाठी राज्यस्तरीय निवड समितीचे स्थापना सर्वच राजकीय पक्षांनी केली आहे.

काँग्रेस पक्षातर्फे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तर शिवसेना ठाकरे गटातर्फे संजय राऊत यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमार्फत वरिष्ठ नेत्यांवर जिल्हानिहाय इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.


लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या जोरदार यशामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून मागवले गेलेल्या अर्ज प्रक्रियेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला असून, पक्षाकडे एकूण 1688 इच्छुकांनी उमेदवारी मागितले आहे. महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या निर्देशानुसार व प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या मान्यतेने सर्व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीसाठी काँग्रेस पक्षाने ज्येष्ठ नेत्यावर जबाबदारी सोपवली आहे. यामध्ये सांगली जिल्ह्याची जबाबदारी सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे या इच्छुक उमेदवारांच्या एक ते आठ ऑक्टोंबर या दरम्यान मुलाखतीत घेणार आहेत. 10 ऑक्टोबरला त्या आपला गोपनीय अहवाल राज्यस्तरीय समितीकडे सादर करतील.

महाराष्ट्रातील इतर विधानसभा मतदारसंघासाठी खालील मान्यवर इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे पुणे शहर व पुणे ग्रामीण, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांच्याकडे नागपूर शहर व ग्रामीण, खा. चंद्रकांत हांडोरे यांच्याकडे ठाणे जिल्हा, खा. प्रणिती शिंदे यांच्याकडे सांगली व सातारा जिल्हा, मुजफ्फर हुसेन यांच्याकडे अहमदनगर जिल्हा, आ. कुणाल पाटील यांच्याकडे नाशिक, माजी मंत्री विधान परिषदेतील गटनेते सतेज उर्फ बंटी पाटील यांच्याकडे मुंबई शहर, अमित देशमुख यांच्याकडे सोलापूर व कोल्हापूर, डॉक्टर नितीन राऊत यांच्याकडे वर्धा व यवतमाळ, यशोमती ठाकूर यांच्याकडे परभणी व हिंगोली, डॉक्टर विश्वजीत कदम यांच्याकडे नांदेड, प्रा. वसंत पुरके यांच्याकडे अकोला, खा. नामदेव किरसान यांच्याकडे वाशिम, खा. डॉ. कल्याण काळे यांच्याकडे लातूर  व बीड, कखा. शोभा बच्छाव यांच्याकडे जालना, आ. संग्राम थोपटे यांच्याकडे मुंबई उपनगर, डॉ. वजाहत मिर्झा यांच्याकडे संभाजीनगर, एम एम शेख यांच्याकडे धाराशिव, हुसेन दलवाई यांच्याकडे पालघर, शिवाजीराव मोघे यांच्याकडे धुळे व नंदुरबार, सुरेश शेट्टी यांच्याकडे सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड, आ. अभिजीत वंजारी यांच्याकडे चंद्रपूर व गडचिरोली, सतीश चतुर्वेदी यांच्याकडे भंडारा व गोंदिया, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे यांच्याकडे बुलढाणा व अमरावती अशा पद्धतीने मुलाखती घेण्यासाठी मान्यवरांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हे नेते दि. एक ते आठ ऑक्टोबर पर्यंत संभाव्य ते जिल्ह्यात इच्छुकांच्या मुलाखती घेणार असून दहा ऑक्टोबर पर्यंत आपला गोपनीय अहवाल प्रदेश काँग्रेस कमिटीकडे सादर करतील. यानंतर राज्य पातळीवरील नेते इच्छुक उमेदवारांमधून निवडून येण्याची क्षमता असलेल्यांनाच संधी देण्यात येणार आहे.