| सांगली समाचार वृत्त |
बंगळूरू - दि. १४ ऑक्टोबर २०२४
‘बुद्धाची मूर्ती ’, ही कथा घडते ब्रह्मदेशाच्या हद्दीवरील निबीड अरण्यात. दुसऱ्या महायुद्धामध्ये जपानी सैनिकांच्या हल्ल्यातून वाचलेला एक भारतीय सैनिक जंगलातून बाहेर पडण्यासाठी लपून छपून मार्ग आक्रमण करत असतांना एका जपानी सैनिकाला पाहतो. भारतीय सैनिकाच्या मनामध्ये जपानी सैनिक आपल्याला कैद करणार किंवा ठार मारणार असे भय निर्माण होऊन तो त्या जपानी सैनिकावर हल्ला करून त्याला ठार मारतो.
जपानी सैनिक मेला आहे याची खात्री झाल्यावर भारतीय सैनिक जपानी सैनिकाच्या मृत देहाकडे निरखून पाहू लागतो आणि त्याच्या लक्षात येते की आपण ज्याला ठार केले ती व्यक्ति सैनिक नसून एक साधा खेडवळ तरूण आहे. त्या तरूणाच्या मृतदेहाकडे पाहात असतांना त्याचे लक्ष त्या तरूणाच्या गळ्यामध्ये अडकवलेल्या बुद्धाच्या मुर्तीकडे जाते. मूर्तीच्या चेहऱ्यावरील शांत, प्रेमाचे भावाने तो सैनिक भारावून जातो. भितीपोटी आपल्या हातून घडलेल्या आततायी कृत्याचा त्याला पश्चाताप होतो. आपल्याकडून अशी चूक परत घडू नये या उद्देशाने तो सैनिक बुद्धाची मुर्ती त्या तरूणाच्या गळ्यातून काढून घेतो आणि परत एक वेळ जंगलातून वाटचाल करू लागतो.
श्रमाने थकून कसाबसा चालत जंगलाच्या बाहेर आल्यावर तिथे असलेल्या एकुलत्या एका घराचा दरवाजा तो ठोठावतो. एक म्हातारा घराचा दरवाजा उघडतो व सैनिक त्याला एका रात्रीसाठी आश्रय देण्याची विनंती करतो. म्हातारा सैनिकाला घरामध्ये घेतो. दार उघडल्याचा आवाज ऐकून घराच्या आतल्या भागात असलेली त्या वृद्धाची बायको त्यांचा मुलगा परत आला कां अशी विचारणा करते. म्हातारा नकारार्थी उत्तर देतो.
भुकेने, तहानेने व्याकुळ झालेल्या सैनिकाची अवस्था पाहून म्हातारा आपल्या पत्नीला सैनिकाला कांही खाण्यासाठी देण्यास सांगतो. म्हातारी थोड्या रागानेच जेवण त्यांच्या मुलासाठी राखून ठेवल्याचे सांगून नकार देते. पण तो वृद्ध आपल्या पत्नीला सैनिकही त्यांच्या मुलासारखाच आहे हे सांगून त्यांच्या मुलासाठी राखून ठेवलेले अन्न सैनिकाला देण्यास आपल्या पत्नीला भाग पाडतो.
जेवण करून सैनिक तृप्त होतो आणि झोपून जातो. झोप झाल्यावर सैनिक उठतो. म्हातारा व त्याची पत्नी त्यांचा मुलगा जंगलातून अजून परतला नसल्याने त्याची वाट पाहात, काळजी करत जागीच असतात. सैनिकाला परत जायचे असल्याने जाताना तो म्हाताऱ्याचे आश्रय, अन्नपाणी दिल्याबद्दल आभार मानतो व त्यांनी केलेल्या उपकाराचे स्मरण म्हणून ती बुद्धाची मुर्ती म्हाताऱ्याला देतो.
ती मुर्ती पाहताच म्हातारा त्याला ती कुठे मिळाली विचारतो. सैनिक त्याला घडलेली हकिकत सांगतो. ती बुद्धाची मुर्ती आपल्या मुलांची आहे असे सांगून म्हाताऱ्याच्या डोळ्यांतून अश्रूच्या धारा वाहु लागतात. आपल्या हातून म्हाताऱ्याच्या मुलाची हत्त्या केली गेली हे सैनिकाला समजते.
ज्या म्हाता-यांने आपल्यासारख्या अनोळखी व्यक्तिला आपला मुलगा समजून आपल्या मुलाच्या वाटणीचे जेवण दिले, रात्रभर आश्रय दिला, त्याच्याच मुलाची आपल्या हातून हत्त्या झाल्याचे सैनिकाला कळून चुकल्यावर त्याला मनोमन अत्यंत दुःख होते आणि तो म्हातार्याला आपणाला कांहीही कठोर शिक्षा करण्यास सांगतो. पण तो वृद्ध सैनिकाला माफ करतो व तिथून तात्काळ निघून जाण्यास सांगतो. सैनिक निघुन जातो आणि ‘बुद्धाची मूर्ती’ ही कथा इथे संपते.
‘बुद्धाची मुर्ती’ या काल्पनिक कथेतील म्हाताऱ्याने मला अलिकडील काळातील कांही घटनांची आठवण करून दिली. एका घटनेमध्ये खून झालेल्या मुलाची आई त्याच्या मुलाच्या खुन्याच्या थोबाडीत मारते व सांगते मी याला माफ केले आहे.
दुसऱ्या एका घटनेमध्ये आपल्या मुलाचा खून करणाऱ्याला कोर्टामध्ये आणल्यानंतर खून झालेल्या मुलाची आई खून करण्याऱ्या मुलाला मिठी मारते व कोर्टला सांगते,
“मी याचा द्वेष करू शकत नाही. द्वेष करणे हा आपला मार्ग नाही, दया करणे हा आपला मार्ग आहे”
‘बुद्धाची मुर्ती’ व आठवलेल्या या दोन घटना माझ्या विचारांना चालना देऊन गेल्या. मी विचार करू लागलो. माणूस हा मुळचा पशू. त्याच्यातील पशुत्व प्रसंगानुसार जाणवते हे ही खरे. पण, हे असे काय आहे ज्याच्यामुळे या पशुतील - जनावरातील माणूस दिसून येतो, जो आपल्या पोटच्या मुलाच्या खुन्यालाही माफ करतो, त्याच्यावर दया दाखवतो ? माणसातील पशुला त्याच्यापासून वेगळा करतो? हा कोणता अखंड धागा आहे जो माणसाला तो माणूस आहे, जनावर नाही याचे ज्ञान करून देतो आणि प्रसंगी माणुसकीचे अत्युच्य उदाहरण बनुन जातो?
ध्रुव भट्टांच्या ‘तत्वमसि’ कादंबरी वाचतांना या प्रश्नांचा कांहीसा उलगडा आपल्याला होऊ लागतो. ‘तत्वमसि’, तोच तू आहेस हे सांगणारी कथा घडते नर्मदेच्या निसर्गरम्य परिसरामध्ये, तिथल्या दाट जंगलामध्ये, आधुनिक जगातील सुधारणांचा स्पर्शही न झालेल्या आदिवासींच्यामध्ये. ‘तत्वमसि’च्या कथानकाची सुरूवात होते, वयाच्या सात-आठ वर्षांपासून परदेशी राहिलेला एक तरूण, पूर्णपणे परकीय विचारांचा होऊन अठरा वर्षांच्या कालावधीनंतर भारतात आदिवासी संस्कृतीच्या अभ्यासासाठी परत येत असतो त्या वेळेपासून. विमानातून भारतात उतरल्यावर नर्मदेच्या जंगलाकडे जात असतांना रेल्वेमध्ये भेटलेले प्रवासी, खेडे-शहरातील रहिवासी, नर्मदेच्या परिसरातील जंगलातील आदिवासी, यांना पाहून त्या तरूणाला जाणवते की, या देशातील बहुसंख्य लोक खूप गरीब आहेत, त्यांना दोन वेळेच्या जेवणाचीही भ्रांती आहे. पण असे असले तरीही, आपल्या गावी आलेल्या परकीयांना, अतिथी देवो भव समजून त्यांचे ते स्वागत करतात, स्वतः अर्धपोटी राहून आपल्या घरातील मीठभाकर प्रेमाने त्यांना खाऊ घालतात आणि तीर्थयात्रेचे पुण्य मिळाले म्हणून आनंदाने वेडे होतात.
या लोकांच्यामध्ये अंधश्रद्धेचे प्रमाण खूप मोठे आहे. अंधश्रद्धेच्या पोटी प्रसंगी एखाद्या महिलेला ती मुलांना खाणारी हडळ, लावसट समजून तिचा जीव घ्यायला उठतात. पण त्याच वेळी नदी पाहिली की श्रद्धेपोटी भक्तिभावाने हात जोडतात, ‘नर्मदे हर’ म्हणून तिला नमस्कार करतात. नदीला, झाडाला, डोंगराला जीवंत समजतात, देव मानतात, त्यांची पूजा करतात. आपली रक्षण नदी, झाड, डोंगर करेल असा त्यांना विश्र्वास वाटतो. श्रद्धेने हे लोक नर्मदेची बाराशे मैलाची परीक्रमा नर्मदा आई आपल्याला सजीव दर्शन देईल या एकाच भक्तिभावापोटी पायी चालत, जंगले तुडवत करतात. परिक्रमेची ही हजारो वर्षांपासून चालत आलेली परंपरा जपतात. आशीर्वाद देतांना “नर्मदामाई तुझे रक्षण करो” असे म्हणतात. यावर “नर्मदा रक्षण करते का बुडवते” अशी कुणी थट्टा केली तरी, “ते तर जशी ज्याची श्रद्धा बेटा”, असे उत्तर शांतपणे अढळ श्रद्धेने देतात.
त्या तरूणाला जाणवते इथे मोठ्या प्रमाणात लोक अशिक्षित आहेत, त्यांनी शाळेचे तोंड देखील पाहिले नाही. परंतु तरीही पाऊस पडणार कां याचे ज्ञान त्यांना होते, जंगलात पेटलेला वणवा जास्तीत जास्त कुठवर पोहचेल हे त्यांना माहिती असते. तारे, ग्रह यांच्या दिशा, त्यांचे भ्रमण यांचे त्यांना ज्ञान असते. सर्व विश्व त्या परमात्म्यापासून उत्पन्न झाले आहे, सर्व चराचरामध्ये एकच मूलतत्व आहे असा विचार सांगणारे कितीतरी अभंग, लोरी, गाणी या अशिक्षीत स्त्रियांना व पुरूषांना अगदी तोंडपाठ असतात. तो भगवंत निराकार आहे, निर्मळ आहे, निरंजन आहे आणि प्रसंगानुरूप तो मानवी अवतारामध्ये सकल जनाय हिताय पृथ्वीतलावर अवतीर्ण होतो हे त्यांना महिती असते.
जंगलातून चालतांना पानं किंवा लहान काड्याकुड्या तुटण्याचा आवाजावरून कोण येत आहे हे समजण्याचे ज्ञान या लोकांना आहे. जंगलातील औषधी वनस्पती ओळखण्याचे, त्यांची पानं, मुळं, फळं, फुलं निवडून आणण्याचे आणि शांतपणे, आत्मविश्वासाने त्यांचा दुखणाईतावर उपचार करण्याचे ज्ञान या लोकांच्या पिढ्यान पिढ्यांतून चालत आले आहे.
इथल्या लोकांना पुढारलेल्या जगातील शिष्टाचारांची माहिती नाही हे तरूणाला समजते पण, या देशातील लोक अनोळखी, अपरिचित लोकांशीही मिळून-मिसळून वागतात, एकमेकांची विचारपूस करतात, मनमोकळेपणाने गप्पा मारतात असेही त्याला आढळून येते.
त्याला आढळून येते की तथाकथित शिष्टाचारांची कदाचित येथील लोकांना माहिती नसेल पण, घरामध्ये व घराबाहेर वृद्धांचा, स्त्रियांचा मान राखणे या लोकांना चांगले माहिती आहे. रेल्वेमधील बाकाच्या एका कोपऱ्यामध्ये हिंदू मंत्र पुटपुटत जप करतो, ध्यान करतो, तर दुसऱ्या टोकाला एखादा मुस्लीम तस्बीहच्या माळेचे मणी फिरवत परवरदिगारचे स्मरण करत असतो. अशा दृश्यातून या देशामधील व्यक्ति एकमेकांच्या धर्माचा मान राखताना दिसतात.
कथेतील त्या तरूणाला कांही प्रसंगावरून वाटते की, या देशातील लोक कमालीचे धार्मिक, धर्मभोळे, धर्माने घालून दिलेल्या रूढी, परंपरांचे आंधळेपणाने पालन करत असतात पण, त्याच वेळी एखादा ब्राह्मण शास्त्री पंडित, “ज्या कोणी हा देश, ही संस्कृती जिवंत ठेवली आहे, त्यांनी धर्माला जीवनाचा पाया मानलेला नाही. ... आपण ईश्वराचे भक्त आहोत, धर्माचे नाही. ... धर्म आपणाला एकत्र आणतो. असं करा, असं करू नका, यावर श्रद्धा ठेवा, यावर श्रद्धा ठेवू नका वगैरे शिकवतो ...
नियम तर आहेतच. बहुतेक सर्व नियम सांस्कृतिक नियम असतात. जीवन शांतपणे आणि चांगलं जगता यावं, म्हणून ते घडवले गेले आणि त्यांचा समावेश धर्मात केला गेला. .... धर्मामध्ये श्रद्धा असण्याची जरूर नाही, पण माणसाला श्रद्धा असली मात्र पाहिजे” असे सांगतांना पाहून तो तरूण आश्चर्यचकित होतो.
तो तरूण पाहतो, या देशातील लोक प्रसंगी सकुंचित वृत्तीचे, स्वार्थाने लडबडलेले दिसतात. पण त्याच वेळी कांहीजन शहर तालुक्यातील ऐषआरामाची चांगली नोकरी सोडून जंगलामध्ये आदिवासींच्यासाठी शाळा चालवण्याचे कष्टप्रद जीवन आनंदाने स्विकारतात तर कांहीजन कुठल्यातरी उर्मीपोटी संसारातून मुक्त होऊन खऱ्या अर्थाने जीवनमुक्त होण्यासाठी घरादाराचा त्याग करतात व संन्यासी-फकिर बनतात. परस्पर विरोधाची ही जीवनशैली पाहून तो तरूणाला संभ्रमात पडतो.
या देशातील बिंगु सारखा आदिवासी आपल्या धाकटा भावाच्या मृत्यूस कारणीभूत झालेल्या नरभक्षक वाघाचा सूड घेण्याचे ठाण घेतो पण, तो वाघ पूर्णपणे कचाट्यात सापडल्यानंतर वाघ नसून वाघीन आहे हे समजल्यावर तिची पिल्ले आपल्या आईची वाट पाहात असतील या विचाराने तिला सोडून देतो आणि माणुसकीच्या अत्युच्य धर्मपालनाचे उदाहरण बनतो.
हे सर्व त्या तरूणाला जाणवून देत, स्पष्ट करत, ‘तत्वमसि’ चे कथानक सांगते “गणेशशास्त्रीचं (ब्राह्मण शास्त्री पंडित) पुरं बोलणं त्यानं ऐकलं असतं तर, त्याच्या (तरूणाच्या) अनेक प्रश्नांची उत्तरं त्याला मिळाली असती. भक्त-भगवान, सेवक-स्वामी, पामर-परम या सर्व नात्यांना छेद देणाऱ्या मस्तीपूर्ण साध्या, सरळ मैत्री संबंधात त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असतं. या देशाच्या संस्कृतीचा पाया कशात आहे? ब्रह्म या संकल्पनेशी असा साधा, सरळ प्रेम करण्याचा, भांडायचा, रूसण्या-मनवण्याचा, अंगाई गीत गाऊन पाळण्यात झोके देण्याचा संबंध, हा या प्रजेला एका दोरीनं बांधून ठेवणाऱ्या अदृश्य धाग्याचा एक तंतू आहे, हे लक्षात आलं असतं.
‘बंदगी मेरे घरसे कहां जायेगी’च्या मस्तीत हिंडणारे सुफी संत, ‘ना मैं कोई क्रिया करम में’चा संदेश हातमागावर विणणारे महामानव, ‘अंते तो हेमनु हेस’ म्हणत सर्व भेदभाव विसरून सर्व चराचराकडे एकाच भावनेने बघणारी मानवरत्नं – या सर्वांचे या प्रजेवर अनंत उपकार आहेत.”
‘तत्वमसि’मध्ये वर्णिलेले या देशातील लोकांचे, संस्कृतीचे असे दगड, माती, पाणी, पाने, फुले, निसर्गाच्या प्रत्येक देणगीशी एकरूप झालेले वर्णन व मानवी स्वभावाचे उलगडलेले कंगोरे पाहून वाचक, त्यातील प्रत्येक पानावरील वर्णनाशी, प्रसंगाशी, प्रसंगातून प्रकटणाऱ्या विचारांशी एकरूप होतो, भारावून जातो आणि मनोरंजना बरोबरच विचार करू लागतो.
माणसाचा खरा धर्म कोणता? संस्कृतीचा पाया कशात असतो? माणसामध्ये दडलेल्या पशुला त्याच्या पासून वेगळा करणारा असा कोणता अखंड घागा आहे जो विविध धर्मांच्या, जातींच्या लोकांना हजारो वर्षांपासून एकत्रीत आणत आहे? वेगवेगळी भाषा बोलणारे, रितीरिवाज असणारे, परमेश्वराची प्रार्थना करण्याचे मार्ग वेगळे असणारे लोक, त्यांच्यातील असमानता, भांडणे, विवाद असुनही कोणत्या अखंड धाग्याने जोडली गेली आहेत?
मित्रांनो अशा या सुरेख शब्दांकन असलेल्या या कथा व कादंबऱ्या आपण जरूर वाचा आणि मनामध्यें उठलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचा आपल्या पुरता शोध घ्या अंतरंगामध्ये.
- आजचे बोल अंतरंगाचे पूर्ण
मनुष्य स्वभाव वर्तवणाऱ्या दोन सुंदर कथा !... (✒️ राजा सांगलीकर)