Sangli Samachar

The Janshakti News

दक्षिण भारत जैन सभेची पाळंमुळं अब्दुललाटच्या मातीत रुजली आहेत - प्रा. एन.डी.बिरनाळे


| सांगली समाचार वृत्त |
अब्दुललाट  - दि. १ ऑक्टोबर २०२४
दक्षिण भारत जैन सभेचे अध्वर्यू स्व. दि. ब. आण्णासाहेब लठ्ठे यांचे पूर्वज हे अब्दुललाटचे. लठ्ठे साहेबांनी सभेच्या माध्यमातून जैन समाजाचे कोट कल्याण केले. सभेच्या या कर्तबगार नेत्याचे पूर्वज हे अब्दुललाटचे पोलीस पाटील. पुढे ते कुरुंदवाडला स्थायिक झाले. कुरुंदवाडात त्यांना लठ्ठ्यावर गौंडर म्हणजे लाटचे पाटील असे संबोधले जाऊ लागले व ते लठ्ठे झाले. 


अब्दुललाटचे जैन समाजावर अनंत उपकार आहेत. अब्दुललाटमधील जैन समाजानं सभेला व वीर सेवा दलाला मोठं योगदान दिले आहे. वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांचे अब्दुललाट हे आवडतं गाव. याच गावानं दक्षिण भारत जैन सभेचे भव्य अधिवेशन भरवले होते. सभेचे सभासद आणि प्रगतीचे वर्गणीदार होण्यासाठी या गावातील प्रत्येक जैन घर पुढं आलं पाहिजे. वीर सेवा दल आणि कर्मवीर भाऊराव पाटील मल्टीस्टेट नागरी सहकारी पतसंस्था वाढवण्यात लाटेचं योगदान लक्षवेधी आहे. या गावात जिनवाणी भक्तीचा महापूर आहे. नव्या पिढीला भ. महावीर समजावून सांगितले पाहिजे. समाज, जैन संस्कृती व आगम परंपरेचे संरक्षण हे आव्हान पेलण्यासाठी आज वर्तमानाला वर्धमानाची गरज आहे.

यावेळी अध्यक्षस्थानी सुरेश चौगुले होते. स्वागत व प्रास्ताविक आणि परिचय अमोल ठिकणे यांनी करून दिला. अशोक चौगुले, भूपाल गिरमल, कर्मवीर बिरनाळे, आदगोंडा पाटील, प्रवीण घाळी, अमोल ठिकणे व वीर सेवा दल, वीर महिला मंडळाचे पदाधिकारी व सदस्य आणि श्रावक श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते. या धर्मनगरीत प. पू. श्री. १०८ कुलभूषणरत्न महाराज यांचे अत्यंत कठिण असे मध्यम उत्कृष्ट सिंहनिष्र्कीडीत महाव्रत संपन्न होत आहे. ते निर्विघ्नपणे पार पडो अशी शुभेच्छा दक्षिण भारत जैन सभेच्या वतीने दिली.