| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २६ ऑक्टोबर २०२४
सांगलीतील व्यापाऱ्याकडून २३ लाखांचा कागद खरेदी करुन त्यापैकी केवळ ७ लाख २३ हजार ८०० रुपयेच देवून व्यापाऱ्याची तब्बल १५ लाख ८१ हजार ८६० रुपयांचा फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत महेश रमेश बियाणी (रा. महेश बंगला, प्लॉट क्र. ६, सरस्वती नगर, विश्रामबाग, सांगली) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे. त्यानुसार पोलिसांनी तोलाराम प्रेमाराम गोदारा आणि विकास तोलाराम गोदारा (दोघेही रा. रो हाऊस क्र. ३, एलोरा प्लॉट क्र. ५, सेक्टर १५ वाशी, नवी मुंबई) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी महेश बियाणी यांचे शहरात मेघा पेपर्स नावाचे कंपनीचे शोरुम आहे. त्यामाध्यमातून त्यांचा विविध कागद विक्रीचा व्यवसाय आहे. मुंबईतील तोलाराम आणि विकास गोदारा या दोघा व्यापाऱ्यांनी बियाणी यांच्याशी संपर्क केला. संशयित गोदारा यांनी बियाणी यांच्याकडून २३ लाख ५ हजार ६६० रुपयांची खरेदी केली. त्यापैकी ७ लाख २३ हजार ८०० रुपये त्यांना दिले. तर बाकीचे पैसे नंतर देतो असे सांगून विकत घेतलेला कागद घेवून दोघे मुंबईला गेले. ही घटना दि. १५ एप्रिल २०१९ ते २५ जुलै २०१९ या कालावधीत घडली. वारंवार पाठपुरावा करुनही राहिलेले उर्वरित पैसे न देण्यास गोदारा यांनी टाळाटाळ केल्याने अखेर महेश बियाणी यांनी फिर्याद दिली आहे.