| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २५ ऑक्टोबर २०२४
सांगलीचे विद्यमान आमदार श्री. सुधीरदादा गाडगीळ यांच्या निवडणूक कार्यालय उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री ना. मुरलीधर मोहोळ यांनी काल येथील टेलर वेल्फेअर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन टेलर व्यवसायिकांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच महामंडळाच्या मागणीबाबत चर्चा केली. टेलरिंग असोसिएशनच्या महामंडळाबाबतचे निवेदन यावेळी त्यांना दिले असता, त्यांनी पुढील बैठकीसाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना पुण्यात येण्याचे निमंत्रण दिले आहे.
टेलर व्यावसायिक हा अन्न-वस्त्र-निवारा या मूलभूत गरजा पुरवणाऱ्या घटकांपैकी एक प्रमुख. मात्र गेल्या काही वर्षात या व्यवसायिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या समस्या सोडवण्यासाठी सांगली शहरातील काही टेलर व्यवसायिकांनी एकत्रित येत संघटना स्थापन केली. आणि स्तरावरील ही संघटना पाहता पाहता राज्यव्यापी बनली. टेलर वेळ असोसिएशन महाराष्ट्र राज्य असे नामाभिधान परिधान करून सध्या ही संघटना टेलर व्यवसायिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेते आहे.
स्थानिक पातळीपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मागण्यांचे गाऱ्हाणे घातले आहे. टेलर व्यवसायिकांचे महामंडळ स्थापन करावे, ही या संघटनेची प्रमुख मागणी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी मान्य केली आहे. मात्र त्यांची ही मागणी लाल फितीत अडकली आहे. ना. मोहोळ हे सांगलीत आले असता त्यांनी संघटनेची महामंडळाची ही मागणी करण्याचे वचन दिले असून, लवकरच याबाबत कार्यवाही करू असे म्हटले आहे.
हे निवेदन देण्यासाठी टेलर वेल्फेअर असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष बसवराज पाटील, राज्य सचिव शशिकांत कोपर्डे, सतीश करमुसे, अरुण वायचळ, उदय मुळे, रवि वादवणे, सौ. वर्षाराणी कोपर्डे, सौ. गीता सुतार, सौ विद्या जाधव इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.