Sangli Samachar

The Janshakti News

देशी गाईंना यापुढे राज्यमाता-गोमाता म्हणून मान्यता मंत्रिमंडळात धडाकेबाज निर्णय !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई   - दि. ३० सप्टेंबर २०२४
महाराष्ट्र सरकारनं देशी गायींना 'राज्यमाता-गोमाता' म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्य सरकारनं अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले, त्यामध्ये हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. हिंदू धर्मामध्ये गाईला गोमातेचा दर्जा दिला जातो. गोमयापासून अनेक घटक मानवाच्या उपयोगी पडत असतात.

मंत्रिमंडळाच्या या बैठकीत महाराष्ट्रातील देशी गायींना 'राज्यमाता-गोमाता' घोषित करण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. चर्चेअंती हा प्रस्ताव मान्य करून यासंदर्भातला शासन आदेश जारी करण्यात आला आहे. यात वैदिक काळापासून असलेले स्थान, देशी गायीच्या दुधाची मानवी उपयुक्तता,आयुर्वेदिक चिकित्सा पद्धती, पंचगव्य उपचार, शेण गोमूत्र यांच्या सेंद्रिय शेतीतील महत्त्वाचे स्थान यामुळे देशी गायीबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे.


'देशी गायीच्या दुधाचे मानवी आहारात पौष्टिकदृष्ट्या अधिक मूल्य आहे. देशी गायींच्या दुधात मानवी शरीर पोषणासाठी महत्त्वाचे अन्नघटक उपलब्ध असल्याने ते पूर्णअन्न असल्याचे म्हटले आहे. देशी गायींच्या दुधाचे मानवी आहाराती स्थान, आयुर्वेद चिकित्सा पद्धतीत पंचगव्याचा वापर तसेच सेंद्रिय शेती पद्धतीत देशी गायींच्या शेण व गोमुत्राचे महत्त्व विचारात घेता देशी गायींच्या संख्येत होणारी घट चिंताजनक बाब ठरत आहे. त्यामुळे देशी गायींचं पालनपोषण करण्यास पशुपालकांना प्रेरित करण्याच्या दृष्टीने त्यांना 'राज्यमाता-गोमाता' घोषित करण्यास मान्यता देण्यात येत आहे', असं यात म्हटलं आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या देशी जातींच्या गायी आढळतात. (उदा. मराठवाडा विभागात देवणी, लालकंधारी, पश्चिम महाराष्ट्रात खिल्लारी, उत्तर महाराष्ट्रात डांगी तर विदर्भात गवळाऊ). तथापि दिवसेंदिवस देशी गायींच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर घट होत आहे', अशी चिंता या आदेशात व्यक्त करण्यात आली आहे.