| सांगली समाचार वृत्त |
कवठे महांकाळ - दि. २९ सप्टेंबर २०२४
लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्याने माजी खासदार संजय काका पाटील हे वैफल्यग्रस्त झाले आहेत. आता विधानसभेला उभे राहण्याचा त्यांचा प्लॅन आहे, परंतु ज्या मतदारसंघातून ते उभे राहणार आहेत, त्याच विधानसभा मतदारसंघात लोकसभेला त्यांना सर्वात मोठा फटका बसला आहे, त्यामुळे विधानसभेलाही त्यांना पराभव पत्करावा लागणार आहे. मग आता ते नगरपंचायतला उभे राहतात की काय अशी माझ्या मनात शंका आहे, अशी बोचरी टीका खा. विशाल पाटील यांनी श्री. संजय पाटील यांच्यावर केली आहे.
कवठेमंकाळ मध्ये माजी नगराध्यक्षांना मारहाण केल्याचा आरोप आमदार सुमनताई पाटील आणि युवा नेते रोहित पाटील यांनी केला असून, मारहाणी व गुंडगिरीच्या निषेधार्थ शनिवारी कवठेमंकाळ मध्ये निषेध सभा पार पडली, यावेळी खा. विशाल पाटील बोलत होते.
यावेळी आपल्या भाषणात बोलताना खा. विशाल पाटील म्हणाले की भाजपचे लोक सांगतात 'ना खायेंगे ना खाने देंगे |' परंतु इथले माझे खासदार केवळ मलिदा खाण्यासाठीच नगर परिषदेमध्ये येतात. कारण लोकसभेला लोकांकडून त्यांनी इतके पैसे घेतलेत की, सकाळी सकाळी लोक पैशासाठी त्यांच्या घरी येतात, त्यामुळे ते घरी थांबतच नाहीत. अशा घाणेरड्या विचाराच्या व्यक्तीला मतदारानी लोकसभा निवडणुकीतून दूर केला आहे, आता विधानसभेलाही यांना कायमचे पद्धतशीरपणे दूर करा असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.
स्वतःच्या राजकारणासाठी ॲट्रासिटीचा गैरवापर केला जात आहे. सर्वसामान्य मागासवर्गीय लोक कधीच कायद्याचा गैरवापर करीत नाहीत हे लक्षात घ्या. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत अद्याप काहीच प्रतिक्रिया दिली नाही याबद्दल टीका करून खा. विशाल पाटील यांनी सांगली जिल्ह्याच्या सुसंस्कृत मतदाराने अशा प्रवृत्तीला दूर केले पाहिजे असेही त्यांनी म्हटले आहे.