| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २२ सप्टेंबर २०२४
नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षातील इच्छुकांनी वरिष्ठांशी संधान बांधले असून, आपल्यालाच उमेदवारी मिळावी यासाठी गॉड फादरचा वरदहस्त बरोबरच वरिष्ठावर दबाव तंत्राचा वापर करण्यात येत आहे. इतर पक्षांबरोबरच काँग्रेसमध्येही यावेळी लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही इच्छुकांची मोठी संख्या असल्याने वरिष्ठांची उमेदवार निवडीसाठी आपले कसं पणाला लावावे लागत आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सांगली संपूर्ण राज्याच्या चर्चेच्या केंद्रस्थानी राहिली. आता पुन्हा एकदा हेच चित्र विधानसभा निवडणुकीतही दिसून येत असून, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा श्रीमती जयश्रीताई पाटील यांनी उमेदवारी बाबत आपला हट्ट कायम ठेवला आहे. त्यामुळे जयश्रीताई पाटील की पृथ्वीराज बाबा पाटील असा पेच निर्माण झाला आहे.
काल श्रीमती जयश्रीताई पाटील व श्री. पृथ्वीराज बाबा पाटील या दोन्ही इच्छुकांनी सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे युवा नेते आ. डॉ. विश्वजीत कदम व खा. विशाल पाटील यांच्या उपस्थितीत छाननी समितीचे प्रमुख मधुसूदन मेस्त्री यांची भेट घेऊन, श्रीमती जयश्रीताई पाटील यांनी आक्रमकपणे तर श्री. पृथ्वीराजबाबा पाटील संयमी भूमिका घेत आपली भूमिका मांडली.
दरम्यान आ. डॉ. विश्वजीत कदम व खा. विशाल पाटील हे आपले वजन, श्रीमती जयश्रीताई पाटील की श्री. पृथ्वीराजबाबा पाटील या दोघांपैकी कोणाच्या पारड्यात टाकतात यावर ही उमेदवारी कोणाला मिळणार हे ठरणार असल्याने, दोघांसमोरही धर्मसंकट उभे राहिले आहे. लोकसभा निवडणुकीत श्रीमती जयश्रीताई पाटील यांनी उघडपणे विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ आपली ताकद लावली होती. तर श्री. पृथ्वीराज बाबा पाटील यांनी पडद्यामागे राहून त्यांना रसद पुरवली होती.
मध्यंतरी आ. डॉ. विश्वजीत कदम यांनी एका कार्यक्रमात बोलताना श्री. पृथ्वीराज बाबा पाटील यांच्याकडे पहात जाहीरपणे म्हटले होते की, लोकसभा निवडणुकीत एका पाटलाला संसदेत पाठवले आहे, आता दुसऱ्या पाटलाला विधानसभेत पाठवायचे आहे. पण त्यावेळी श्रीमती जयश्रीताई पाटील उमेदवारीवरून इतक्या आक्रमक झालेल्या नव्हत्या. मात्र आता आपल्याला उमेदवारी मिळाली नाही तर बंडखोरी करण्याचा पवित्रा श्रीमती जयश्रीताई पाटील यांनी घेतल्याने तसेच त्यांच्याशी असलेल्या नातेसंबंधांमुळे त्यांच्यासमोर धर्मसंकट उभे राहिले आहे.
आ. डॉ. विश्वजीत कदम यांच्याप्रमाणेच खा. विशाल पाटील यांचे श्रीमती जयश्री पाटील यांच्याशी रक्ताचे नाते आहे. त्यामुळे हे दोन्ही नेते काय भूमिका घेतात यावर सांगलीतील काँग्रेसची उमेदवारी निश्चित होणार असल्याने दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांसह जनतेत याबाबत उत्सुकता दिसून येत आहे.