Sangli Samachar

The Janshakti News

सौ. नीताताईंचे चिरंजीव सारंग केळकर यांना 37 लाखांना फसवले, पोलिसांनी ई-बाईक कंपनीवर केला गुन्हा दाखल !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २३ सप्टेंबर २०२४
सांगलीतील भाजपाच्या ज्येष्ठ निताताई केळकर यांचे चिरंजीव सारंग श्रीरंग केळकर यांना हरियाणाची ओकिनावा टोटेक इंटरनॅशनल प्रा. लिमिटेड या कंपनीच्या दुचाकी आणि अन्य साहित्याकरिता डिपॉझिटच्या माध्यमातून 35 लाख 86 हजार 685 रुपयांना गंडा घातल्याने, सारंग केळकर यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जितेंद्र शर्मा, रूपाली शर्मा, अभिमन्यू बागल आणि विकास रात्रा (सर्व रा. 3 एम्. एअर इंडिया कार्यालया नजीक, सेक्टर 71, गुरुग्राम हरियाणा) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, सारंग केळकर यांनी ओकिनावा टोटेक इंटरनॅशनल प्रा. लिमिटेड या कंपनीची एजन्सी घेतली होती. मध्यंतरी कंपनीने आपल्या नावात ओकिनावा टोटेक इंटरनॅशनल प्रा. लिमिटेड या कंपनीच्या नावात बदल करून कंपनीत कार्यरत असणाऱ्या वरील पाच संशयितांनी फिर्यादी सारंग यांच्याकडून 5 मार्च 2019 ते 20 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये दोन लाख रुपये अनामत म्हणून तर स्पेअर पार्ट्स मिळवण्यासाठी तीन लाख 13 हजार 311 रुपये, ई बाईक खरेदीसाठी 22 लाख 67 हजार रुपये घेतले होते. सारंग केळकर यांनी विविध बँक खात्याच्या माध्यमातून सदर रक्कम कंपनीच्या खात्यामध्ये वर्ग केले होती. ग्राहकांनी ई-बाईक घेतल्यावर वॉरंटी मध्ये बाद झालेल्या बॅटरी तसेच स्पेअर पार्ट कंपनीकडून न मिळाल्याने सारंग केळकर यांनी सदर ग्राहकांना स्वतःचे 8 लाख 6 हजार 376 रुपये नुकसान भरपाई दिली. 

यानंतर या रकमेसाठी कंपनीकडे वारंवार पाठपुरावा करूनही कंपनीकडून कोणताच प्रतिसादन आल्याने अखेर सारंग केळकर यांनी तक्रार दाखल केली होती. त्या अनुषंगाने पोलिसांनी संशयतावर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.