| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २३ सप्टेंबर २०२४
काकांशी उभा दावा मांडत अजित पवार 40 आमदारांसह महायुतीत दाखल झाले खरे... पण सध्या त्यांच्या गटाची अवस्था 'ना घर का ना घाट का !' अशी झाली आहे. महायुतीत दाखल झाल्यानंतर उपमुख्यमंत्री पदासह काही महत्त्वाचे मंत्रिपदे पदरात पाडून घेऊन अजित पवार यांनी सत्तेशी जवळीक साधली. परंतु पहिल्या दिवसापासूनच भाजपातील एक गट त्यांच्या विरोधात राहिला. संघ परिवाराने ही अजित पवार यांना सत्तेत सामावून घेतल्याने देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवर तोफा डागल्या. सत्तेची ऊब मिळत असतानाही दादा गटातील आमदार अस्वस्थ दिसून येत होते. याला कारण म्हणजे भाजपा आणि शिंदे गटाकडून मिळणारी सापत्न भावाची वागणूक.
लोकसभा निवडणुकीत या गटाला अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत. अगदी अजित पवार यांना आपल्या पत्नीलाही निवडून आणता आले नाही. सुनील तटकरे यांच्या रूपाने एकमेव खासदारकी यांच्या पक्षाच्या पदरात पडली
त्यामागे सुद्धा अजित पवार किंवा पक्षाची ताकदीपेक्षा सुनील तटकरे यांची ताकद आणि स्थानिक राजकारणच कारणीभूत ठरल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते
या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांच्यावर महायुतीतून आणि स्वपक्षातून स्वतंत्र लढण्यासाठी दबाव वाढू लागला आहे. याचे कारण लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अपेक्षित जागा मिळण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे. महायुतीतील भाजपा हा सर्वात प्रबळ पक्ष आहे त्यांना 160 ते 170 जागा पदरात पाडून घ्यायच्या आहेत, तर शिंदे गटाला 100 जागांची अपेक्षा आहे. त्यामुळे अजित पवार गटाला केवळ 20 ते 25 जागावर बोळवण केली जाण्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
त्यामुळे अजित पवार गटाच्या आमदारांमध्ये चलबिचल सुरू असून, जर महायुतीमध्ये आपली कुचुंबना होत असेल, तर आपण स्वतंत्र लढलेलेच बरे. परंतु लोकसभेचा अनुभव पाहताना, विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाला महायुती आणि महाआघाडीशी लढत असताना कितपत यश मिळेल याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. अजित पवार गटातील काही जणांचे म्हणणे आहे, आपण स्वगृही परतूया. परंतु आता शरद काकांनी परतीचे सारे दोर कापून टाकल्याने ही शक्यताही कमीच असल्याचे चित्र आहे.
यामुळे अजित पवार यांची गोची झाली असून, नेमका काय निर्णय घ्यायचा याबाबत ते चिंताग्रस्त आहेत. आणि याचमुळे त्यांचा राग सार्वजनिक सभामधून दिसून येत आहे. नुकत्याच एका जाहीर सभेमध्ये त्यांनी आपला राग स्वपक्षातीलच वरिष्ठ नेत्यावर काढल्याचे अनेकांनी पाहिले. अजित पवार हा चक्रव्यूह कसा भेदतात, भाजपसह शिंदे गटाची रणनीती ते कसे परतावून लावतात आणि आपल्या पक्षाच्या वाट्याला शिंदे गटाइतक्याच जागा कशा मिळवतात, याकडे सर्वच राजकीय पक्षांसह अजित पवार गटातील आमदार, वरिष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.