Sangli Samachar

The Janshakti News

सिव्हिल हॉस्पिटल समोरील रुग्णालयांच्या पार्किंग बाबत महापालिका ॲक्शन मोडवर, उपाययोजनांचे निर्देश, नागरिकांतून समाधान !



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १ सप्टेंबर २०२४
सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील रस्त्यावर होणाऱ्या वाहनांच्या पार्किंग बाबत प्रभाग क्रमांक 15 मधील नागरिकांच्या तक्रारीचे दखल महापालिकेने घेतले असून, येथील खाजगी हॉस्पिटल्स, लॅबोरेटरी आणि औषध दुकानात येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांची वाहने, रस्त्यावर पार्किंग केली जाऊ नयेत, यासाठी संबंधित हॉस्पिटल्स, लॅबोरेटरी आणि औषध व्यापाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

प्रभाग समिती क्रमांक दोन येथील कार्यालयात नुकतीच सहाय्यक आयुक्त विद्या सानप, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. रवींद्र ताटे, माजी नगरसेवक मंगेश चव्हाण, फिरोज पठाण तसेच संबंधित परिसरातील रुग्णालयाचे प्रतिनिधी, नागरिक, नगर रचना व अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

शासकीय रुग्णालयासमोर गणेश नगर गल्ली क्रमांक दोन ते पाच या परिसरात विविध रुग्णालये, लॅबोरेटरीजची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. येथे येणारे रुग्णांचे नातेवाईक आपली वाहने रस्त्यावरच पार्किंग करीत असतात. याचा या परिसरातील नागरिकांना मनस्ताप भोगावा लागत आहे. स्थानिक रहिवाशांच्या तक्रारीवरून माजी नगरसेवक मंगेश चव्हाण यांनी महापालिकेकडे पाठपुरावा केला होता. 


या तक्रार अर्जावरून महापालिका प्रशासनाने 
 सदर बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी डॉ. रवींद्र ताटे व सहाय्यक आयुक्त विद्या सानप यांनी संबंधित विभागांना उपाययोजनांचे निर्देश दिले. यावेळी मंगेश चव्हाण व फिरोज पठाण यांनी समन्वयाने मार्ग काढण्याबाबत भूमिका मांडली.