| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १९ सप्टेंबर २०२४
नरेंद्र मोदी यांच्या एनडीए सरकारला शंभर दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मोदीजींच्या 'चाय पे चर्चा'च्या धर्तीवरील 'खर्चे पे चर्चा' अभियान राबविण्याचे आवाहन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या नेत्या श्रीमती सोनिया गांधी तसेच अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा अलकाजी लांबा व महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संध्याताई सव्वाशे यांनी केले होते. त्यानुसार काल महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्ष शैलजा भाभी पाटील यांच्या नेतृत्वाखाली येथील छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडई परिसरात 'खर्चे पे चर्चा' हा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी परिसरातील भाजी विक्रेत्यांसह महिला ग्राहकांनीही यामध्ये सहभाग घेतला. अनेक महिलांनी वाढलेल्या महागाई बाबत व बेरोजगारी बाबत तक्रार नोंदवली. तर काही महिलांनी आम्हाला १५०० रुपये नकोत, महागाई कमी करा, आमच्या मालाला हमीभाव द्या, आमच्या मुलाबाळांना रोजगार द्या, जुने दिवस परत द्या अशा अपेक्षा व्यक्त केल्या.
छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडई परिसरातील या 'खर्चे पे चर्चा' कार्यक्रमाची चर्चा नंतर भाजी मंडई परिसरात रंगली होती. केवळ चर्चेचा फार्स करून काय उपयोग ? सक्षम विरोधक म्हणून काँग्रेसने आपली भूमिका पार पाडावी आणि महागाई कमी करण्याबरोबरच, बेरोजगारी व इतर महत्त्वाच्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरावे अशी अपेक्षा येथील महिला व्यक्त करीत होत्या.