Sangli Samachar

The Janshakti News

सार्वजनिक गणेश मंडळ व महापालिका आयुक्तांमधील वाद, जयश्रीताई पाटील व पप्पू डोंगरे यांच्या मध्यस्थीने संपुष्टात !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १२ सप्टेंबर २०२४
सांगली येथील गणेश मंडळांनी उभारलेल्या जाहिरात कमानीला कर लावण्याचा फतवा सांगली महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी आज सकाळी काढला व त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश मालमत्ता अधिकारी व अतिक्रमण विभागाला दिले. त्यानुसार पथकातील अधिकारी व कर्मचारी हे कॉलेज कॉर्नर येथील सावकार गणपती जवळ कारवाईसाठी गेले असता, सांगलीतील सर्व गणपती मंडळे एकत्र येऊन त्यांनी आयुक्तांच्या निर्णयाचा निषेध केला. आणि दुपारी निघणारी सांगली संस्थानची मिरवणूक रस्ता रोको करून अडविण्याचे आंदोलन करण्याचा इशारा दिल्याने अखेर आयुक्तांनी माघार घेतली व कारवाई थांबविण्याचे आदेश दिले. सांगलीतील सर्व गणेश मंडळांनी आंदोलनाचा इशारा दिल्याने काहीकाळ वातावरण तणावग्रस्त बनले होते. शहर पोलिस निरीक्षक मोरे यांनी कारवाई थांबवल्याची माहिती गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

आयुक्तांच्या मनमानी कारभाराचा गणेश मंडळांनी निषेध केला. आतापर्यंत कधीही गणेश मंडळांसमोर लावलेल्या जाहिरातींवर कर लावण्यात आला नव्हता. यावर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंडप तसेच स्वागत कमानीसाठी पाडले जाणारे खड्यांबाबत पैसे घेऊ नयेत, असे आदेश काढले आहेत. मात्र त्यापुर्वीच सांगलीतील अनेक मंडळांनी महापालिकेकडे रितसर पैसे जमा केले आहेत. हे पैसे महापालिकेकडून अद्याप परत मिळालेले नाहीत.


पटेल चौक गणेश मंडळाचे प्रमुख अजित सुर्यवंशी यांनी या प्रकरणाचे गांभिर्य ओळखून सर्व गणेश मंडळांनी एकत्रित केले आणि तेथे काँग्रेसच्या नेत्या श्रीमती जयश्रीताई पाटील यांनी येऊन आयुक्त गुप्ता यांच्याशी दुरध्वनीवरून संपर्क साधून जाहिरात कर रद्द करावा, अशी विनंती केली. यावेळी अशोक शेट, अजिंक्य पाटील, शशिकांत नागे, शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे आटी उपस्थित होते