| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ११ सप्टेंबर २०२४
भाजपा विरोधी नेत्यांची लफडी कुलंगडी बाहेर काढणाऱे भाजपचे वरिष्ठ नेते व मुलुख मैदान तोफ, किरीट सोमय्या यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपा निवडणूक समितीचे अध्यक्ष रावसाहेब दानवे यांना पाठवलेले एक खरमरीत पत्र व्हायरल झाले आणि भाजपा सह राजकीय क्षेत्रात खळबळ माजली.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक महिन्यातील महिन्यावर आली आहे. या निवडणुकीत विजयाचा झेंडा फडकवण्यासाठी महाआघाडी आणि महायुतीकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. महायुतीच्या शिंदे सरकारने यासाठी अनेक लोकप्रिय योजना जाहीर केल्या. त्याच वेळी भाजपने व्यवस्थापन समितीची स्थापना केली. आणि हीच समिती सोमय्या यांच्या नाराजीस कारणीभूत ठरली आहे.
भाजपने स्थापन केलेल्या व्यवस्थापन समितीमध्ये किरीट सोमय्या यांचे नाव निवडणूक आयोग संपर्कप्रमुख म्हणून जाहीर केले होते. सोमय्या यांचे म्हणणे आहे की, आपणाला न विचारता या पदावर माझी नेमणूक करण्यात आली आहे. बावनकुळे यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी, आपण या समितीचे सदस्य नाही. त्यामुळे अशी अवमानकारक वागणूक पुन्हा आपणास देण्यात येऊ नयेत. यापूर्वीही पक्षाने माझ्यावर अन्याय केला आहे.
18 फेब्रुवारी 2019 रोजीच्या हॉटेल ब्लू येथे झालेल्या भाजप-शिवसेना संयुक्त पत्रकार बैठकीतून उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याने भाजप नेत्यांनी मला तेथून निघून जाण्यास सांगितले. हे माझ्यासाठी अत्यंत लाजिरवाणी गोष्ट होती. तरीही मी पक्षाचा सामान्य कार्यकर्ता म्हणून कार्यरत होतो. भाजपच्या सांगण्यावरूनच मी ठाकरे सरकारची अनेक लफडी बाहेर काढली. यामुळे माझ्यावर जीवघेणे हल्लेही झाले. परंतु मी न घाबरता, कोणाच्याही दबावलांना बळी पडतात माझे काम सुरू ठेवले आहे, व ठेवणारी आहे असे किरीट सोमय्या यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.