Sangli Samachar

The Janshakti News

मा. शरद पवार एक अजब रसायन, 84 व्या वर्षी पावसात भिजत सभा, आता पायाला जखमा असतानाही आंदोलनात सहभाग !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १ सप्टेंबर २०२४
मा. शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणातील कोणालाही न समजणारं एक अजब रसायन. भ्रष्टाचाराच्या चिखलात असल्याचा आरोप, पण कमळाप्रमाणे अंगाला कुठलाही डाग नाही. भ्रष्टाचाराबद्दल ट्रकभर पुरावे असल्याचा गवागवा. पण ज्यांनी आरोप केले, त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसण्याचे काकांचे कसब वाखाणण्याजोगे. मुलाप्रमाणे प्रेम केलेल्या पुतण्याने पक्ष व चिन्ह पळवले. पण आकांडतांडव न करता नव्याने पक्ष व चिन्ह घेऊन, 'मी अजून विझलो नाही' हा संदेश देण्यासाठी हा गृहस्थ तुफान पावसात भिजतो. उभा आडवा महाराष्ट्र पालथा घालतो. आणि लोकसभा निवडणुकीत महाआघाडीला पुन्हा केंद्रस्थानी आणतो.

आज शरद पवार यांचे एक नवे रूप मुंबईकरांसह महाराष्ट्रवासियांना पहावयास मिळाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील महाराष्ट्राचे आराध्य छत्रपतींचा पुतळा कोसळल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाचा वणवा पेटला. आता महाआघाडी या वणव्यात आपली राजकीय पोळी भाजून घेणार नाही, हे कसे शक्य होते ? तसे ते घडलेही. संपूर्ण राज्यात महाआघाडीने याबाबत रान पेटवले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागूनही आज सकाळी मुंबई येथे 'जोडे मारो' आंदोलन करण्यात आले. यासाठी हुतात्मा पार्क ते गेटवे ऑफ इंडिया असा पायी मार्च काढण्यात आला. 


मुंबईतील या मोर्चाच्या आणि महाराष्ट्रभरच्या चर्चेच्या केंद्रस्थानी होते ते 'शरद बाबू'... पायाला जखमा असतानाही, पट्ट्या बांधून शरद पवार अनवाणी या मोर्चात सहभागी झाले होते. आता कुणाला यामध्ये भले नाटक दिसो, पण घडले ते कोणीच नाकारू नाही. हे राजकारणासाठी केले असेलही. आणि याचा फायदा महाआघाडीला कितपत होतो हे आगामी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर दिसून येईलच. तोपर्यंत 'चर्चा तर होणारच' !