Sangli Samachar

The Janshakti News

आगामी गणेशोत्सव व ईद-ए-मिलाफ सण मिरजेच्या ऐतिहासिक परंपरेनुसार शांततापूर्ण वातावरणात संपन्न व्हावा, प्रशासनाचे आवाहन


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३१ ऑगस्ट २०२४
मिरजेला विविध सण शांतता आणि सौदार्हाने साजरे करण्याचे परंपरा आहे. विशेषतः येथील गणेशोत्सवाची विसर्जन मिरवणूक ही संपूर्ण राज्यात सुप्रसिद्ध आहे. याच दरम्यान येणारा ईद-ए-मिलाफ हा सणही जातीय सलोखा राखून साजरा केला जातो.

यंदाही त्याच ऐतिहासिक परंपरेला अनुसरून गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाफ सण साजरे व्हावेत, अशी अपेक्षा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी व्यक्त केले आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या मिरज येथील सभागृहात आगामी सणांच्या निमित्ताने सामाजिक कार्यकर्ते व विविध मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती, यावेळी संदीप घुगे बोलत होते.


सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आपल्या परंपरेनुसार सामाजिक उपक्रम हाती घ्यावेत, तसेच भाईचाऱ्याच्या बांधिलकीची जपणूक करून हे सण साजरे करावेत अशी अपेक्षा व्यक्त करून, गणेशोत्सव काळासह कायमस्वरूपी या परिसरात सीसीटीव्ही बसविण्यात यावेत असे आवाहन केले. चांगले उपक्रम राबवणाऱ्या सार्वजनिक मंडळांना यावेळी बक्षीस देणार असल्याचेही त्याने यावेळी सांगितले. 

यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी महापालिका प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनेची माहिती दिली. यामध्ये रस्ते स्वच्छ ठेवणे, एक खिडकीद्वारे परवाने देणे, भटक्या जनावरांची उपायोजना करणे अशा उपक्रमांची माहिती दिली.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते व सार्वजनिक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाबाबत महत्त्वाच्या सूचना केल्या. यामध्ये मिरवणूक मार्ग स्वच्छ आणि खड्डे मुक्त असावा त्याचप्रमाणे सर्वत्र पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात यावे, उत्सव काळात अखंडित वीज पुरवठा व्हावा अशा सूचना केल्या. 

यावेळी विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यंदाचा गणेशोत्सव डॉल्बीमुक्त व लेसर किरण शो व्यतिरिक्त साजरा करावा, अशी मागणी समाजातून होत आहे, त्याची अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा सार्वजनिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. डॉल्बी आणि लेसर शो करण्यामुळे नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात आरोग्याबाबत मोठ्या समस्या निर्माण होत असल्याचे सांगून या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. तेव्हा अनेक सार्वजनिक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही अशा पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे मान्य केले.