Sangli Samachar

The Janshakti News

कथा अशाही एका पलायनाची....


| सांगली समाचार वृत्त |
बंगळूरु - दि. २६ ऑगस्ट २०२४
“जिंदगी में आदमी दोच वक्त ऐसा भागता है, एक ऑलम्पिक का रेस हो या पुलिस का केस हो”, 
फिल्म अमर, अकबर,अँन्थोनीमधील अमिताभ बच्चनचा एक जोरदार डायलॉग. पण अशी परिस्थिती व त्याला साजेसे डायलॉग हे फक्त सिनेमामध्येच बरंका. वास्तव जीवनामध्ये जीव तोडून पळण्याचे कितीतरी प्रसंग येतात. अशा रितीने पळ काढण्याला मनाचा दुबळेपणा, भित्रेपणा, पळपुटेपणाही म्हणता येईल. पण खरं तर, असे हे जे प्रसंग असतात ना ते आपला स्मृतीगंध आपल्या मनामध्ये कायम ठेवतात. तो प्रसंग, ते ठिकाण, त्या व्यक्तिंशी आपले एक अदृश्य नाते जोडलेले असते आणि विणले गेलेले असतात अतुट ऋणानुबंध. अशाच ऋणानुबंधाच्या कांही गाठी आज मी तूमच्यापुढे उलगडणार आहे, अगदी हळुवारपणे, कुठेही त्यांना धक्का न लावता. 

त्यावेळी मी सात-आठ वर्षांचा होतो. गावातल्या शाळेमध्ये मी जात असे. शाळा आमच्या घरापासून तशी जवळच, एक दोन गल्ल्या पार पाडली की होती. तो काळ छडी लागे छम् छम्, विद्या येई घमघमचा. शाळेतील मुलांशी, त्यांच्या पालकांशी, शिक्षकांचे संबंध एकाच कुटुंबातील असल्याप्रमाणे घरगुती, आपुलकीचे. त्यामुळे मुलांचे कांही चुकले, अभ्यासात दुर्लक्ष होत आहे असे आढळले तर त्यांना खरपूस मार देण्याची पुरेपुर मुभा पालकांनी शिक्षकांना दिलेली असायची. त्यामुळे विद्यार्थी शाळेतील शिक्षकांना टरकुन असत. 

मी ज्या शाळेत जात होतो ती शाळा भरायची श्री विठ्ठल-रूखमाईचे मंदिरात. ‘विठोबाच्या देऊळातील शाळा’ या नांवानेच ती ओळखली जायची. शाळेची इमारत म्हणजे एक मोठा चौक व त्या चौकामध्येच भिंती बांधून तयार केलेली एक लंबुळकी स्वतंत्र खोली-वर्ग. या वर्गाचा व चौकाचा एक दरवाजा रस्त्याच्या बाजुला. शिवाय वर्गातून चौकात जाण्यासाठी आणखी एक दरवाजा. इतर दोन खोल्या अशाच केल्या होत्या. बस्स संपली शाळेची इमारत. 


रस्त्याकडेच्या चौकाकडील दारातून विद्यार्थी, शिक्षक शाळेमध्ये आणि भक्त मंडळी देवळात प्रवेश करायची. शाळेमधील त्या लंबुळक्या खोलीत एक वर्ग आणि मोठ्या चौकात तीन वर्ग बसायचे. एका बाजूला येलपंडी म्हणजे आजची नर्सरी आणि इयत्ता पहिलाचा वर्ग. कांही अंतर सोडून इयत्ता दुसरीचा वर्ग व त्याच्या बाजूला कांही अंतरावर तिसरीचा वर्ग भरायचा. मोठ्या चौकामध्ये एका उंच चौथ-यावर छोटेखानी मंदीर. त्यात सर्वांचे योगक्षेम पाहणारा विठोबा दोन्ही कर कटेवरी ठेऊन उभा.

शाळेमध्ये हेडमास्तरसह एकूण चार शिक्षक. गणिताचे शिक्षक गोरेपान, इंग्रजी एक आकड्याप्रमाणे शिडशिडीत अंगकाठी, धोतर, पांढरा शर्ट, कपाळावर गंधाची टिकली व डोक्यावर पांढरी गांधी टोपी असा साधा वेष पण, कसा काय कोण जाणे त्यांच्या नाकाचा शेंडा कायम लाल दिसायचा आणि मुलांचे गाल, पाठ लालभडक करून सोडण्यामध्ये त्यांचा हातखंडा असायचा. 

शाळेच्या हेडमास्तरांचे व्यक्तिमत्वही असेच वेगळे. कमरेला धोतर, अंगावर शर्ट व त्यावर नेहमी खादीचा कोट. त्यांचा उजवा हात नेहमी थरथर कापायचा, पण तेही मुलांना असे मारायचे की त्यांना पाहिल्यावरच मुलांना कापरे भरायचे. हे शिक्षक मुलांना मारायचे. पण त्यामागे आपल्या विद्यार्थ्यांची प्रगती व्हावी, त्याला चांगले वळण लागावे, त्याचे भावी आयुष्य चांगले घडावे हाच उद्देश असायचा. खरं तर या माराच्या भितीपोटीच मला ३० पर्यंतचे पाढे पाठ झाले. पावकी, निमकी, औटकी येऊ लागली. ज्याचा उपयोग मला बॅंकेमध्ये कॅलक्युलेटरच्या मदतीशिवाय ठेवीचे किंवा कर्जाचे व्याज काढताना झाला.

शाळेमध्ये आणखी दोन शिक्षक होते. त्यातील एका शिक्षकांना गाण्याचा छंद होता. त्यांचा गळाही गोड होता. ते हिंदी सिनेमातील गाण्याच्या चाली कविताना अशा रितीने लावायचे की ती कविता मुलांना लगेचच तोंडपाठ होऊन जायची आणि ब-याच काळ लक्षात राहायची. मला आज इतक्या वर्षांनंतरही दुस-या किंवा तिस-या इयत्तेमधील ‘सावली’ या कवितेतील,  
अग ये ताई ही कुठली आली बाई ।।ध्रु।।
हात उचलता हात उचलते
खाली बसता खाली बसते
जिथे मी जाते तिथे ही येते 
या ओळी या शिक्षकांनी या कवितेला राजकपूरच्या ‘अनाडी’ सिनेमातील ‘सब कुछ सिखा हमने ना सिखी होशीयारी’ या गाण्याची चाल लावल्यामुळे आजही आठवत आहेत. 

तर अशी ही माझी शाळा. शाळेच्या आजुबाजूच्या परिसरामध्ये अठरापगड जातीचे व व्यवसाय करणारे लोक. त्यातही मुस्लिमांची संख्या जास्त. विठ्ठलाच्या देवळापासून म्हणजे शाळेपासून हाकेच्या अंतरावर मशिद. मंदीर वजा शाळेमध्ये विद्यार्थी ज्ञानार्जन करायचे, शिक्षक ज्ञानदान व हिंदू धर्मीय भक्त मंडळी आपली भक्ति-श्रद्धा भगवंताला अर्पण करायचे. अधूनमधून कधीतरी टाळ, मृदंगाच्या ठेक्यात भक्तिरसाने ओथंबलेली दिंडी, ‘जयजय रामकृष्ण हरी, गोपाळा गोपाळा गोपाळा देवकीनंदन गोपाळा, विठ्ठलविठ्ठल श्रीहरी विठ्ठल’, अभंग-भजने गात शाळेजवळ येऊन थांबायची. तर कधी पीरांना ताशा वाजवत मुस्लीम बांधव शाळेजवळून घेऊन जात. अशा वेळी कांही काळ मास्तर शिकवायचे थांबवत, शक्य असेल तर दिंडीला नमस्कार करून येत, पीरांसमोर धुप जाळत. 

सांगायचा मुख्य मुद्दा हा की त्याकाळी असे हे सारे छान सामंजस्याचे, प्रेमाचे, एकोप्याचे वातावरण होते. ना कुणाचा कुणाला अडथळा ना त्रास. सारे कसे गुण्यागोविंदाने सुरळीत चालू असायचे व पार पडायचे. ही अशी सुस्वर, सुसंवादाची परिस्थिती शाळेमध्ये व शाळेबाहेर असतांनाही एके दिवशी मी मुसळधार कोसळणा-या पावसात पाठीवरील दफ्तराची धोपटी व कमरेची अर्धी चड्डी सावरत जीव तोडून शाळेतून धूम ठोकली होती. 

त्याचे काय झाले, ते पावसाळ्याचे दिवस होते. शाळेमध्ये फक्त दोन शिक्षक हजर होते. एक गणिताचे लाल नाकाचे व दुसरे हाताला कापरे असणारे हेडमास्तर. दोघेही मारकुटे. आमचा वर्गावर कुणीही शिक्षक नव्हते. गणिताचे शिक्षक येऊन फळ्यावर कांही गणिते लिहून मुलांना सोडवण्यास सांगून गेले. पण त्यांची पाठ वळताच ब-याच पोरांनी आपली पाटी टाकून दिली व वर्गामध्येच एकमेकाला मारणे, पळापळी सुरू झाली. कांही मुले मात्र शांतपणे खाली मान घालून पाटीवर गणिते सोडवत होती, मी ही त्यातील एक. वर्गातील दंगा व बाहेरील पाऊस वाढु लागला आणि अचानक वर्गामध्ये शांतता पसरली, पण क्षणापुरतीच. 

फट्-फट् आवाज माझ्या कानावर आला. मी मान वर करून पाहिले. हेडमास्तर व गणिताचे शिक्षक दोघेही आमच्या वर्गामध्ये आलेले होते आणि एक एक पोराचे गाल व ढुंगणे लालकाळी होऊ लागली होती, कांहींच्या पाठीचे धिरडे बनू लागले होते. ते पाहून मला कापरे भरले. त्यात भर पडली एका बाजूने लाल नाकाचे शिक्षक व एका बाजूने हेडमास्तर मी जिथे बसलो होतो तिकडे मुलांना चोप देत येतांना पाहून. पावसाचा आवाज व मुलांचे तोंड दाबून रडणे दोन्ही चढत्या भांजणीने वाढू लागले होते. तो सगळा देखावा पाहून माझ्या मनाचा थरकाप झाला, मी घाबरलो. आपलीही पाठ आता मऊ होणार या विचारांने माझी चड्डी ओली व्हायची वेळ आली. मनांतल्या मनांत मी कांहीतरी ठरवले आणि ‘धप्प’. पाठीवर दफ्तर अडकवुन, अर्धी चड्डी सावरत वर्गामधून मी भर पावसात जी हनुमान उडी मारली ती एकदम रस्त्यावरच. 

‘अरे कोण तो, पकडा, पकडा’ चा कालवा उठला. पण मी कसला सापडतो. रस्त्यावर पोहचताच जीव तोडून मी जी धूम ठोकली, सुसाट पळालो ते घरामध्ये येऊनच थांबलो. 
तर मित्रांनो, ऑलम्पिकची रेस किंवा पोलिसांची केस नसतांनाही अशा प्रसंगी पळायला लागते त्याचा हा किस्सा, जो घडला त्याला आत साठ वर्षांहून अधिक कालावधी होऊन गेला आहे.

आज ती शाळा, ते शिक्षक, सख्खेसोबती कोणी नाहीत, पण तो स्मृतीगंध अजूनही माझ्या मनात दरवळत आहे कारण, त्या मातीशी माझे ऋणानुबंधाचे अदृश्य नाते जोडलेले आहे. 
आता अधेमध्ये मी कधीतरी गावी जातो. गावी गेलो की माझी पाऊले आपसुकच शाळेकडे वळतात, पण तिथे जाता विठोबाचे देऊळ सोडले तर कांहीही राहिले नाही याची जाणीव होते आणि मन उदास होते. मग देवळाचे दार उघडे असेल तर मी आतमध्ये जातो आणि ‘त्याला’ विनवतो, 

“अरे बाबा, असे कमरेवर हात ठेऊन तू किती काळ उभा राहणार आहेस, कांही तर कर आणि माझी ती शाळा, मारकुटे कां असेनात पण ते शिक्षक, सुरेल गळ्याचे शिक्षक, माझे स्नेही, टाळ, मृदुंग वाजवत भक्तिरसाने ओथंबलेली ती दिंडी, ते पीर, तो ताशा, ते सारे छान सामंजस्याचे, प्रेमाचे, एकोप्याचे वातावरण, तो गुण्यागोविंदाने सुरळीत चालणारा प्रपंच, तो सुस्वर, तो सुसंवाद मला परत दे, किमान एक वेळ तरी परत दे”

विनवता विनवता माझ्या मिटलेल्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागतात. कांही वेळ असाच जातो. मिटलेल्या डोळ्यांना शांत मंद प्रकाश जाणवतो आणि त्या शांत मंद प्रकाशातून ‘तो’ येऊन शब्दांविना सांगतो, 

“योग्य वेळ आली की तुला जे हवे आहे ते सर्व मी परत एक वेळ तुला देणारच आहे. फक्त आणखी कांही क्षण कळ काढ.” 

परत कांही वेळ जातो आणि मला जाणवते मिश्कीलपणे गालातल्या गालात हसत ‘तो’ मला विचारत आहे, 

“पण काय रे या वेळी तू मागच्या सारखी धूम तर ठोकणार नाहीस ना?”

- आजचे बोल अंतरंगाचे पूर्ण

😄😄😄