Sangli Samachar

The Janshakti News

माझ्याच डोळ्यांनी मला फसविले... (✒️ राजा सांगलीकर)


| सांगली समाचार वृत्त |
बंगळूरु - दि. ३१ ऑगस्ट २०२४
कोणतीही गोष्ट आपण आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिली की त्यातील खरे-खोटेपणा, सत्य-असत्यता आपल्याला समजत असते. पण कधीकधी आपल्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहुनही आपली फसगत होत असते. याचा प्रत्यय नुकत्याच घडलेल्या दोन घटनांवरून मला आला.       
 
दररोज सकाळी व दिवसातून अधेमधे कधीही मी आमच्या घराच्या खिडकीतून बाहेरचा देखावा पाहात बसतो. मागील आठवड्यामध्ये एके दिवशी सकाळी मी खिडकी बाहेर पाहात असताना बाजूच्या भल्या मोठ्या मोकळ्या प्लॉटमधील एका लहानशा झुडपामध्ये कांहीतरी हालचाल करताना दिसले. त्या वस्तूचा आकार, काळपट-तपकिरी रंग व शेपटी पाहून तो भारद्वाज पक्षी असावा असे मला वाटले. सकाळी भारद्वाज पक्ष्याचे दर्शन झाल्यामुळे मला खूप आनंद झाला आणि हात जोडून मी त्याला नमस्कार केला. पुढचे दोन दिवस तो भारद्वाज पक्षी त्याच झुडपावर त्या जागी बसलेला मला दिसला. तिस-या दिवशी सकाळी तो भारद्वाज पक्षी पाहताना त्याची शेपटी हलण्या व्यतिरिक्त अन्य कोणतीही हालचाल मला न दिसल्याने माझ्या मनात शंका उद्भवली आणि मी दुर्बिणीतून त्याच्याकडे पाहिले आणि मला समजले. माझ्या डोळ्यांनी मला फसवले आहे. तो भारद्वाज पक्षी नव्हता, तर काळपट-तपकिरी रंगाची ती कापडाची चिंधी होती जिचे एक टोक वाऱ्याने हलत होते.  

दुसरा एक असाच प्रसंग या घटनेनंतर लगेचच घडला. माझे मित्र श्री. उदय कावेरी यांनी माझ्या व्हॉट्सॲपवर पिवळ्याधमक, रसलेल्या पेरूचा फोटो पाठविला होता. त्या पेरूच्या झाडाच्या खालच्या फांदीवर दोन-तीन हिरवे लहान लहान लिंबू लागलेले मला दिसले. खात्री करण्यासाठी मी कावेरींच्याकडे विचारणा केली. आणि त्यांनी सांगितले फोटोतील पेरूच्या फांदीवर दिसणारी हिरवे लिंबू नसून पेरूच आहेत. तो पेरूचा फोटो मी मोठा करून पाहिला आणि मला समजले, पुन्हा एकदा माझ्या डोळ्यांनी मला फसवले आहे. फोटोमध्ये असलेल्या हिरव्या पेरूंना मी लिंबू समजलो होतो.  


लागोपाठ झालेल्या माझ्या या दोन फसगतीवर, ही फसगत कां व कशी झाली यावर मी विचार करू लागलो. आणि मला समजले. माझ्या फ्लॅट बाजूच्या प्लॉटमध्ये मागे दोन-तीन वेळ मी भारद्वाज पक्षी पाहिला होता. त्यामुळे वा-यावर हलणा-या कापडाच्या चिंधीला मी भारद्वाज पक्षी समजलो आणि लहान कच्च्या हिरव्या पेरूना पाहताना मला हिरव्या रंगाचे लिंबू आठवले होते त्यामुळे मी त्यांना लिंबु समजलो. 

थोडक्यात या दोन्ही वेळेस डोळ्यांकडून मिळालेल्या संदेशाला मी मनात साठलेले पूर्व विचार जोडल्यामुळे माझी फसगत झाली होती. फ्रेंच तत्वज्ञ रेने डेकार्टेस् यांचे एक सुवचन आहे ते म्हणतात, “ज्यांनी एकदा जरी आपल्याला फसविले असले, तरी त्यांच्यावर कधीही पूर्ण विश्वास ठेवू नये हे शहाणपणाचे आहे. इंद्रिये वेळोवेळी फसवणूक करत असतात.” 
ज्ञानेंद्रियांकडून होणा-या फसवणुकीचा माझा अनुभव आणि रेने डेकार्टेस् यांचे सुवचन यांच्यावर विचार करताना मला समजले की, ज्ञानेंद्रिये आपली फसवणुक करत असतात हे नक्की आणि ती टाळण्यासाठी त्यांच्याकडून मिळणा-या प्रत्येक संदेशातील वास्तवता व सत्य जाणणे महत्वाचे आहे. 

परंतु माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस बाह्य जगाची माहिती आपल्या ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून घेत असतो व आपल्या मनामध्ये साठवत असतो. या साठवणीतून त्याच्या मनामध्ये अनेक विचार निर्माण होतात, जे ज्ञानेंद्रियांकडून मिळालेल्या पाहण्याच्या, ऐकण्याच्या, चव, गंध, स्पर्श समजण्याच्या संदेशाला आपसुकपणे जोडले जात असतात. वर्तमानक्षणातील घटनांबाबत ज्ञानेंद्रियांनी दिलेल्या संदेशाला भूतकाळात मनात साठलेल्या आवड-निवड, इच्छा, अपेक्षा, श्रद्धा-अंधश्रद्धा, रूढी, परंपरा, तुलना यांचे चांगले-वाईट, योग्य-अयोग्य, बुरसट, जुनाट, पुर्वविचार जोडले गेल्याने ज्ञानेंद्रियांकडून मिळालेला संदेश सदोष बनतो. अशा दुषित संदेशाचे केले जाणारे मुल्यांकन, निष्कर्ष अर्थातच चुकीचे, पूर्वग्रहदूषित व एकांगी असू शकते. ज्याच्यामुळे मनामध्ये भ्रम, संभ्रम, गैरसमजुत निर्माण होऊन फसवणुक, नुकसान, मानसिक त्रास, क्लेश, दुःख होते.  

हे सर्व लक्षात घेता ज्ञानेंद्रियाकडून मिळणाऱ्या संदेशातील वास्तवता, सत्य-असत्यता जाणणे व त्यासाठी काय केले पाहिजे हे समजणे खूप महत्वाचे आणि जरूरीचे आहे. यासाठी भ. बुद्धांची खाली दिलेली कथा आपल्याला मदत करू शकते. (संदर्भ-१) 

“एक साधक साधुसारखा विरक्त, सदाचारी व ईश्वरपरायण होता. पण त्याला अद्याप पूर्ण साक्षात्कार झालेला नव्हता. साक्षात्काराची शेवटची पायरी कशी ओलांडावी याचा तो शोध घेत होता. मार्गदर्शनासाठी तो भ. बुद्धांना भेटायला गेला. भ. बुद्धांना वंदन करून त्यांने उपदेश करण्याची, मार्ग दाखविण्याची विनंती केली. भ. बुद्धांनी थोडक्या शब्दात आपली मौक्तिक वचने सांगून त्या साधकाचे जन्माचे कल्याण केले. भ. बुद्ध त्या साधकाला म्हणाले,
“तू जेंव्हा पाहशील तेंव्हा नुसते पाहा. ऐकशील तेंव्हाही पूर्ण अवधानाने नुसते ऐक. गंध, रस, स्पर्श तुला इंद्रियांकडून मिळेल, तेंव्हाही तो अखंड पूर्णत्वाने घे.” अवधानाचे हे रहस्य त्या साधकाने सहजतेने व निरलसतेने आत्मसात केले आणि तो निर्वाणाच्या शून्यत्वाला पोहचून मुक्त झाला.

या कथेमधून हे समजून येते की एखादी घटना, प्रसंग, व्यक्ति, ... पाहताना नुसते पाहिले पाहिजे, ऐकताना पूर्ण अवधानाने ऐकले पाहिजे, गंध, रस, स्पर्श अखंड-पूर्ण समजून घेतले पाहिजेत, आणि ज्ञानेंद्रियाकडून मिळणा-या संदेशाबाबत अवधान राखले पाहिजे, सजग राहिले पाहिजे. पण मनामध्ये साठलेल्या व क्षणाक्षणाला साठत जाणा-या विचारांची व्यापकता आणि मनाची चंचलता यांचा विचार केला तर हे वाटते तितके सोपे नाही.

वरील सर्व विवरणातून हे स्पष्ट होते की, ज्ञानेंद्रियांकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी त्यांच्याकडून मिळणाऱ्या संदेशावर विसंबून तात्काळ कोणतीही प्रतिक्रिया, कृती करू नये, मत बनवू नये. ज्ञानेद्रियांच्या अधीन न राहाता यम-नियम, ध्यान-धारणा, प्रत्याहाराचे पालन करून व आत्मनिरीक्षण, आत्मपरिक्षणाच्या आधारावर पालनाने प्रत्येक संदेशाची योग्यरित्या छाननी करावी, सत्यासत्यता, वास्तवता यांचे परिक्षण करावे व नंतर आपल्या सद्सद्विवेक बुद्धीनुसार योग्य ती प्रतिक्रिया व कृती करावी. जेणेकरून होणारी संभाव्य फसवणूक, नुकसान, मानसिक त्रास, क्लेश, दुःख टाळता येऊ शकेल.     
इन पाँचो से बन्धिया, फिर फिर धरै शरीर । 
जो यह पाँचो बसि करे, सोई लागे तीर ।। - संत कबीर !

अर्थात जो पाच इंद्रियांच्या बंधनात बांधला गेला आहे, तो फिरून फिरून शरीर धारण करतो, पुन्हा-पुन्हा जन्म घेत राहातो. आणि दुःख भोगत राहातो. जो आपल्या पाचही इंद्रियांना आपल्या वशात, स्वाधीन करतो तोच भवसागराच्या पैलतीराला लागू-पोहचू शकतो. 

- आजचे बोल अंतरंगाचे पूर्ण
संदर्भ-१. सदरची कथा सारांश रूपाने लेखामध्ये दिली आहे. मूळ कथा श्री. वि. वि. गोखले संकलित ‘ अध्यात्म कथा कलश ’ या पुस्तकात ‘ पहाशील तेव्हा नुसता पहा ’ ही आहे. मूळ कथेच्या शेवटी कंसामध्ये संदर्भः दी आर्ट ऑफ लिव्हींग - विल्यम हार्ट असा उल्लेख आहे. ‘ अध्यात्म कथा कलश ’ 
पुस्तक प्रकाशक अंजली पब्लिशिंग हाऊस, पुणे.