Sangli Samachar

The Janshakti News

दहा दिवस... आठ जिल्हे... अत्याचाराच्या बारा घटना... पूर्वगामी महाराष्ट्राचे भयावह चित्र !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २४ ऑगस्ट २०२४
महाराष्ट्र... छत्रपतींच्या शौर्याने तरुणांचे रक्त सळसळणारी राज्य... संतांची भूमी... आर्थिक आणि शैक्षणिक राजधानी... क्रीडा क्षेत्रात अगदी ऑलिंपिकपर्यंत कर्तुत्वाचा झेंडा फडकवणारा प्रदेश... वैद्यकीय, न्यायालय, उद्योग-व्यापार असे एकही क्षेत्र नाही जिथे, महाराष्ट्राने आपला कार्यकर्तृत्वाचा नावलौकिक मिळवला नाही... किती कौतुक करावे पुरोगामी महाराष्ट्राचे... पण आता महाराष्ट्राच्या नकाशावर वासनांध नराधमांच्या बेधुंद कारनाम्यांनी काळे फासले जात आहे...

गेल्या फक्त दहा दिवसात आठ जिल्ह्यांमध्ये अल्पवयीन तसेच तरुणींवर बारा घटना घडल्याने महाराष्ट्र सून्न झाला आहे. मग याला जबाबदार कोण ? आपली न्यायव्यवस्था ? सहज उपलब्ध होणारे अश्लील साहित्य ? राजकारणी ? की मग समाज ?... असे काळे कारनामे करणाऱ्यांना कायद्याचे भय उरले नाही. का ?... यात अडकलेल्यांना कुणाचे अभय मिळते ? कायद्यात कडक तरतूद असूनही, आरोपी मोकाट कास सुटतात ? एकापाठोपाठ एक अशा महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणाऱ्या घटना का घडत आहेत ?... 


मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर अकोला, लातूर आणि कोल्हापूर. या जिल्ह्यांची ही नावे पाहिल्यानंतर, खरंच जिथं अभिमानानं मान ताठ व्हावी असे हे जिल्हे. आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, वैद्यकीय, या जिल्ह्यातील अनेक धोरणांनी आपला नावलौकिक गाजवला. जिल्ह्याचे नाव केवळ राज्यातच नव्हे, तर देशात किंबहुना जगात मोठे केले. मग असे काय घडले ? आणि का घडले ? जिथे अभिमानाने गौरवावे नररत्ने जन्माला आली तिथेच माणुसकीला काळीमा फासणारी ही अघोरी जमात निर्माण झाली ?...

आता पुन्हा या नावलौकिकाचा गौरव आणि कर्तृत्व निर्माण करायचे असेल, राज्याच्या ऐतिहासिक गतवैभवावर लागलेला काळा डाग पुसायचा असेल, तर याबाबतीत समाज सुधारकांनी, मनोवैज्ञानिकांनी, न्यायिक क्षेत्रात प्रामाणिकपणाचा झेंडा फडकवणाऱ्या कायदे तज्ञांनी, आणि ज्यांच्या हातात कुटुंबाबरोबरच राजकारणाची दोरी आहे अशा महिलांनी, व राज्याची घडी घडविणाऱ्या वा बिघडविणाऱ्या पुरुषांनीही याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ जवळ आली आहे. कोवळ्या अजाण बालिकांवर, तरुणी आणि महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांवर शिवाजी महाराजां प्रमाणेच कडक उपाययोजना करण्याची जिगर दाखवायला हवी. तरच आणि तरच इथले स्त्रीधन सुरक्षित राहील.