Sangli Samachar

The Janshakti News

गरजू गुणवंत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आता एचडीएफसी बँकेची शिष्यवृत्तीचे पाठबळ !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २४ ऑगस्ट २०२४
महाराष्ट्र ही गुणवंत किर्तीवंत शिक्षण क्षेत्राची खाण मानली जाते. यापूर्वी अनेक नामवंतांनी शैक्षणिक गुणवत्तेत आपला झेंडा केवळ राज्याच्या व देशाच्या नव्हे तर साता समुद्रा पार ही फडकविला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांप्रमाणेच इतर अनेक मान्यवरांनी महापालिकेच्या अथवा कंदीलाच्या दिव्याखाली अभ्यास करून आपल्या गुणवत्तेचा कस आणि घ्यावे लागणारे कष्ट याचा इतिहास निर्माण केला. परंतु सध्याचे शिक्षण महागल्यामुळे ते सर्वसामान्यांच्या मुलांसाठी दिवा स्वप्नच ठरत आहे. परिणामी गरिबांघरचीच नव्हे तर सर्वसामान्य घरातील हुशार मुलांना कर्तृत्व असूनही शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे.

सध्या महाराष्ट्र शासन मुलींसाठी उच्च शिक्षण मोफत केले आहे. परंतु शिक्षणासाठी लागणाऱ्या इतर साहित्याचे दर गगनाला भिडले आहेत. अशातच अनेकांना खाजगी क्लासेसची आवश्यकता असते. ज्यांची फी अशा गरीब व सर्वसामान्य कुटुंबांसाठी अवाक्याबाहेर असते. परिणामी अनेक तरुण-तरुणी उच्च शिक्षणापासून वंचित राहतात.


आणि हीच अडचण ओळखून समाजातील अनेक दानशूर व्यक्ती अशा गरीब व सर्व सामान्य कुटुंबातील हुशार विद्यार्थी विद्यार्थिनींच्या मागे उभे राहतात. अनेक संस्थां शिष्यवृत्तीच्या माध्यमातून हातभार लावत असतात. अशाच संस्थांमध्ये आता एचडीएफसी बँकेचे नाव जोडले गेले आहे. या बँकेकडून होतकरू विद्यार्थ्यांना 15 हजारापासून 75 हजार रुपयांपर्यंत शिष्यवृत्तीच्या माध्यमातून आर्थिक मदत दिली जात आहे. 

एचडीएफसी बँकेने ईसीएसएस अर्थात 'एचडीएफसी बँक परिवर्तन एज्युकेशनल क्रायसिस स्कॉलरशिप सपोर्ट' योजना तयार केली असून माध्यमातून होतकरू, हुशार तरुण-तरुणींना 15 ते 75 हजार रुपयापर्यंत शिष्यवृत्ती दिली जात आहे. यामध्ये पहिलीपासून बारावीपर्यंत तसेच पदविका, आयटीआय, पॉलिटेक्निक, पदवी, पदव्युत्तर पदवी अशा अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती देण्यात येते. अर्थात यासाठी काही नियम बनवण्यात आले आहेत, ते असे...

या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 सप्टेंबर आहे. एचडीएफसी बँकेच्या या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करावयाचा असेल तर तुम्ही अटीचीं पूर्तता करणे गरजेचे आहे. भारतीय नागरिकता असणारेच विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात. विद्यार्थी सध्या इयत्ता पहिली ते 12, पदविका, आयटीआय, पदवी, पदव्युत्तर पदवीच्या अभ्यासक्रमात शिकत असावा. विद्यार्थ्याने याआधीच्या इयत्तेत कमीत कमी 55 टक्के गुण मिळवलेले असणे गरजेचे आहे. विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. गेल्या तीन वर्षांपासून जे विद्यार्थी वैयक्तिक तसेच कौटुंबिक पातळीवर अडचणींचा सामना करत आहेत आणि पुढे शिक्षण पूर्ण करू शकणार नाहीत, अशा विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल.

कोणत्या विद्यार्थ्यांना किती शिष्यवृत्ती ?
 
📍इयत्ता 1 ते इयत्ता 6 वीत शिकणारे विद्यार्थी- 15 हजार रुपये.
📍इयत्ता 7 वी ते 12, पदविका, आयटीआय, पॉलिटेक्निकचे शिक्षण घेणारे विद्यार्थी- 18 हजार रुपये.
📍पदवीचे शिक्षण घेणारे विद्यार्थी- 30 हजार रुपये.
📍पदवीचे (व्यावसायिक) शिक्षण घेणारे विद्यार्थी- 50 हजार रुपये.
📍पदव्यूत्तर पदवीचे शिक्षण घेणारे विद्यार्थी- 35 हजार रुपये.
📍पदव्यूत्तर पदवीचे (व्यावसायिक) शिक्षण घेणारे विद्यार्थी- 75 हजार रुपये.

याचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या गरजू पण हुशार विद्यार्थ्यांच्या पालकांनी स्थानिक एचडीएफसी बँकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून किंवा बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर अधिक माहिती संपर्क साधू शकतात.