Sangli Samachar

The Janshakti News

ना. नितीन गडकरी यांना बहिणीने राखी बांधली, पण ओवाळण्यासाठी खिशात पैसेच नव्हते तेव्हा...


| सांगली समाचार वृत्त |
वर्धा - दि. २० ऑगस्ट २०२४
केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी हे अत्यंत संवेदनशील गृहस्थ म्हणून ओळखले जातात. साधी राहणी उच्च विचारसरणी हे त्यांच्या वैशिष्ट्य. पण नाती जपण्याबाबतही त्यांचा उल्लेख आदराने केला जातो. त्यांच्या दातृत्वाचे अनेक प्रसंगही सांगितले जातात. त्यांच्याकडे आलेली व्यक्ती कधीही रिकाम्या हस्ते परत जात नाही असेही बोलले जाते. पण कालच्या रक्षाबंधनाच्या दिवशी त्यांच्या मानस भगिनींनी राखी बांधल्यानंतर जो प्रसंग घडला, तो थोडा मजेशीर म्हणायला हवा.

सुप्रसिद्ध समाजसेविका डॉ. स्मिता कोल्हे या ना. नितीन गडकरी यांच्या मानस भगिनी. प्रतिवर्षी त्या रक्षाबंधनानिमित्त त्यांना राखी बांधण्यासाठी नागपूरला पोहोचायच्या. पण अलीकडे वयपरत्वे कोल्हे यांना रक्षाबंधनानिमित्त नागपूरला जाणे शक्य होत नाही. पण या रक्षाबंधना दिवशी गडकरी हे करुणाश्रम येथील एका कार्यक्रमानिमित्ताने वर्ध्यात आले असताना, डॉ. स्मिता कोल्हे व रवी कोल्हे तेथे पोहोचल्या, आणि याच ठिकाणी त्यांनी ना. गडकरी यांना राखी बांधली.


आपल्या भगिनींनी राखी बांधल्यानंतर ना. गडकरी यांनी ओवाळणी देण्यासाठी आपल्या खिशामध्ये हात घातला... पण... त्यांच्या खिशात पै ही नव्हती. तेव्हा शेजारी उभ्या असलेल्या गिरीश गांधी यांच्याकडून काही रक्कम घेतली आणि ती आपल्या भगिनीच्या रक्षाबंधनाच्या ताटामध्ये ठेवली. डॉ. स्मिता कोल्हे व ना. गडकरी हे एकाच शाळेत शिकले. अक्षर ओळख शिकताना नात्यांची ओळखही इथेच निर्माण झाली, आणि ना. गडकरी व डॉ. स्मिताताई कोल्हे यांचे बहीण भावाचे हे नाते गेली 25 वर्षे आबाधित आहे.