Sangli Samachar

The Janshakti News

सार्वजनिक गणेश मंडळासमोर यंदा सीसीटीव्ही लावण्याची सुनील फुलारी यांची सूचना !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २५ ऑगस्ट २०२४
वाढत्या गुन्हेगारी आणि अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव साजरा होतो आहे. या काळात पोलिस व जिल्हा प्रशासनाची परवानगी घेणाऱ्या प्रत्येक गणेशोत्सव मंडळाने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची सूचना कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

सांगली दौऱ्यावर असताना श्री. फुलारी यांनी काही गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची प्राथमिक बैठक घेतली. त्यांच्या सूचना समजावून घेतल्या. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुका, त्यानंतरचे राज्यातील राजकीय व सामाजिक स्थिती, बंद, आंदोलने यामुळे पोलिसांवर ताण जाणवत आहे. अशातच आता आगामी गणेशोत्सवासह सर्व सण शांततेत व मंगलमय वातावरणात पार पडावेत, यासाठी पोलीस सतर्क आहेतच, परंतु गणेश मंडळांनीही त्यांना मिळणाऱ्या वर्गणीचा सदुपयोग करावा. वेळेच्या मर्यादेचे पालन करावे, ध्वनिक्षेपकाबद्दल असलेल्या सूचना, रस्त्यावर किती टक्क्यापर्यंत मंडप उभारावा, याबाबत दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन फुलारे यांनी केले आहे.


शासनाच्या स्पर्धेत सहभागी व्हावे, तसेच सर्व प्रकारचे प्रदूषण टाळावे पर्यावरणपूरक उत्सव साजरा करावा, असे सांगून श्री. सुनील फुलारी पुढे म्हणाले की, ध्वनी प्रदूषण तसेच प्रकाश प्रदूषण याबाबत पोलीस दलाकडून कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. प्रदूषण निर्माण करणाऱ्या उत्पादनावर बंधन घालता येत नाही. परंतु त्याचा वापर करून कायदेशीर तरतुदींचे भंग केल्यानंतर, पोलिसांना कारवाई करावी लागते. आगामी गणेशोत्सव शांततेत पार पाडला जावा यासाठी पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगारावर प्रतिबंधक कारवाई करण्यात येत आहे यंदाच्या उत्सवात प्रत्येक मंडळाने लोक वर्गणीतून परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. उत्सव काळात आणि त्यानंतर ही त्याचा सर्वांना चांगला उपयोग होईल, असेही श्री. सुनील फुलारे यांनी सांगितले.

यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक संदीप घुगे म्हणाले की, जी मंडळे अटी शर्तीचे पालन करतील, चांगले देखावे उभारतील, डीजे मुक्त आणि पर्यावरण पूरक सण साजरा करतील, अशा मंडळांना उपविभागीय पोलीस अधिकारी स्तरावर पारितोषिके दिले जातील. प्रत्येक गणेश मंडळाला पोलीस दत्तक घेतील. दत्तक मंडळांच्या ठिकाणी नेमल्या जाणाऱ्या पोलिसांना सर्व गणेशोत्सव मंडळांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.

गणेश मंडळांनी वर्गणीसाठी कोणावरही जबरदस्ती करू नये. जबरदस्तीने वर्गणी मागितल्याची तक्रार आल्यास, नाईलाजाने आम्हाला कायदेशीर कारवाई करावी लागेल, असा इशाराही अधीक्षक घुगे यांनी यावेळी दिला.

कोल्हापूर पोलीस परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. सुनील फुलारी यांच्या पत्रकार परिषदेवेळी अधीक्षक संदीप घुगे, अप्पर अधीक्षक रितू खोकर, उपविभागीय अधिकारी तसेच पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सुधीर भालेराव आदी अधिकारी उपस्थित होते.