Sangli Samachar

The Janshakti News

विधानसभा निवडणुकीसाठी आपल्याकडे 700 ते 800 दिग्गजांची उमेदवारीकरिता मागणी - मनोज जरांगे!


| सांगली समाचार वृत्त |
अंतरवाली - दि. २५ ऑगस्ट २०२४
नाही नाही म्हणत पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आता विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय पक्का केलेला दिसतो आहे. 'आपल्याकडे आतापर्यंत 800 इच्छुकाने अर्ज दिलेले असून यामध्ये अनेक माजी व विद्यमान आमदारांसह अनेक मातब्बर नेत्यांचा समावेश आहे.' असे त्यांनी म्हटले आहे.

प्रसार माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे यांनीच ही माहिती दिली असून, आपल्याकडे आलेल्या अर्जांची छाननी तज्ञांची समिती करेल, त्यानंतर याबाबतचा निर्णय घेतला जाईल. अद्यापही आपल्याकडे अर्ज दाखल होत आहेत त्यामुळे इच्छुकांचे अर्ज स्वीकारण्याची तारीख वाढवायचे का नाही हे ठरवावे लागेल असेही मनोजरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

पश्चिम महाराष्ट्रातून सर्वाधिक अर्ज आल्याचे सांगत मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे की, मराठवाडा आणि विदर्भातून ही चांगला प्रतिसाद आहे मात्र कोकण आणि मुंबई विभागातून कमी अर्ज आले आहेत, येथून अजूनही अर्ज येण्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले आहे.


येत्या 29 तारखेला आंदोलनाच्या वर्षपूर्तीनिमित्त अंतरवाली सराटीत एक छोटे कानी चर्चासत्र ठेवणार आहोत. मराठा समाजाने ताकतीने हे आंदोलन लावून धरले आहे त्यामुळे त्यात यश मिळाले असल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. या यशात सर्व गोरगरीब मराठा समाजाचा सहभाग असल्याचेही जरांगे यांनी सांगितले.

आपल्या प्रत्येक सभेला लाखोंची संख्या असल्याबद्दल जरांगे पाटील म्हणाले की मराठा समाजाच्या कानावर काहीही आलं तरी हा समाज सभेला उपस्थित राहतो त्यामुळे माझ्या समाजाच्या चरणी मी नतमस्तक होत आहे. केवळ एका हाकेने हा समाज जमा होतो. त्यामुळेच मला लढण्याचे बळ मिळते, असेही जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

आता विधानसभा निवडणुकीत जरांगे पाटील यांच्या सभेला लाख-लाखांच्या संख्येने उपस्थित असलेल्या समुदायाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. हा समाज केवळ सभेसाठी एकत्र येतो, की या संख्येचे परिवर्तन मतांमध्ये निर्माण होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.