Sangli Samachar

The Janshakti News

राज्यात काँग्रेसला 'अच्छे दिन' विधानसभेसाठी तब्बल १४०० लोकांनी केले अर्ज दाखल !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३१ ऑगस्ट २०२४
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला झालेल्या मतांच्या टक्केवारीमुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाकडे इच्छुकांचा कल वाढलेला दिसून येत असून, तब्बल 1400 जणांनी निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी मिळावी म्हणून अर्ज केले आहेत. यामध्ये मराठवाडा आणि विदर्भातील इच्छुकांची संख्या मोठी आहे. इच्छुकांची संख्या पाहता, उमेदवारी मिळावी म्हणून अनेकांनी देव पाण्यात घातले आहेत.

नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने 17 जागा लढवल्या आणि त्यातील 13 जागांवर विजय संपादन केला होता. त्यामुळे काँग्रेस नेत्यांचा आत्मविश्वास बळावला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात केलेल्या सर्वेवरून, काँग्रेसला मतदारांची प्रथम पसंती असल्याचे दिसून आले आहे. त्यानुसार पक्षाला विधानसभेमध्ये 80 ते 85 जागा मिळतील आणि काँग्रेस राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरेल असे येत आहे.


मतदारांचा कल आणि हाती आलेला सर्वे यावरून काँग्रेस श्रेष्ठीनी 288 जागावर इच्छुकांचे अर्ज मागविले होते. त्यानुसार 1400 अधिक इच्छुकांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. विदर्भ आणि मराठवाड्यावर भाजपाचे वर्चस्व होते. गेल्या अनेक निवडणुकांमध्ये येथे महायुतीने जम बसवला होता. मात्र अपेक्षा पूर्ण करून न शकल्याने लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसने या भागात जोरदार मुसंडी मारल्याचे दिसून येत आहे.

2014 च्या मोदी लाटेत संपूर्ण राज्यात काँग्रेस वाहून गेली. मोठ्या प्रमाणावर पक्षाची पडझड झाल्याने अनेक दिग्गज नेत्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला. मात्र आता मतदारांचा कल बदलल्याने घरवासीचे चिन्हे दिसून येत असून, सध्या काँग्रेस प्रथम क्रमांकावर असल्याचे सर्वे मधून समोर येत आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीतील निकालाच्या आकडेवारीवरून 288 मतदारसंघांपैकी 90 विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेस प्रथम क्रमांकावर आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अवघे 476 अर्ज आले होते. परंतु आता यामध्ये तिपटीने वाढ झाल्याने, काँग्रेस नेत्यांचा मुख्यमंत्री पदावर हक्क वाढल्याचे बोलले जात आहे.