Sangli Samachar

The Janshakti News

एक होते वॉशींगमशीन ... (✒️ राजा सांगलीकर)


| सांगली समाचार वृत्त |
बंगळूरु - दि. ४ ऑगस्ट २०२४
दृश्य १ - वॉशिंगमशीनमध्ये धुण्यासाठी कपडे टाकले आहेत. कपड्याचा अंदाज घेऊन वॉशिंग पावडरही टाकली आहे. वॉशिंगमशीन सुरू झाले आहे. थोडा वेळ मशीनने आपले कामही केले. पण कुठे तरी कांहीतरी बिघडले. खडाड् खट्, खडाड् खट्, ऊंsss, ऊंsss, खडाड् खट्, खडाड् खट् ऊंsss, ऊंsss वॉशिंगमशीनमधून आवाज येऊ लागला. 

दृश्य २ - मशीनचा आवाज बाजुच्या डायनिंग टेबलच्या खुर्चीला सहन होईना. ती मशीनवर एकदम खेसकली, “ए थेरड्या गप्प बस की, किती जोरात ओरडत आहेस, मेले हे म्हातारे सगळा मूड खराब करून टाकतात.”

खुर्चीचे बोलणे ऐकून तिला साथ न देईल ते डायनिंग टेबल कसले. त्यानेही वॉशींगमशीनला उभे-आडवे चांगलेच फैलावर घेतले. 

“अरे म्हाता-या, काय ही तुझी रोजची कटकट. तुझे अर्ध्याहून अधिक पाय कबरीमध्ये कधीच पोहचले आहेत, आता तरी गप्प बस, सारखं विव्हळायचच. स्वतःला आणि दुस-यालाही त्रास. काय ही तुझी दशा. तुझा मूळचा रंग कुठला होता हे तरी कळत कां आता, नाही ना, आणि जागोजागी उडालेले टवके. कांही खरं नाही तुझे. आता कायमचा गप्प बस बघू...” 


दृश्य ३ - खुर्ची, टेबलचे हे बोलणे. वॉशिंग मशीन मधून येत असलेला खडाड् खट्, खडाड् खट्, ऊंsss खडाड् खट्, खडाड् खट् ऊंsss, ऊंsss आवाज. आजूबाजूच्या सगळ्यांना आता चेव चढला आहे. सिलींग फॅन, शो केस मधील बाहुल्या, शो पिसेस, भिंतीवरील चित्रे, हॅंगीग्ज, सगळेजण वॉशिंगमशीनवर ओरडू लागले आहेत. 
 
दृश्य ४ - सर्वजण वॉशिंगमशीनला उगाचच रागवत आहेत हे जाणून कोप-यातील केरसुनीला राहवेना. 

“ऐ का उगाच त्या बिचा-याला त्रास देत आहात. वयोमानाप्रमाणे उद्भवणा-या प्रकृतीच्या सगळ्या तक्रारी सुरू झाल्या आहेत त्याच्या. त्यातच त्याला दम्याचा व हृदय विकाराचाही त्रास आहे. कांही दिवसापुर्वीच नाही कां त्याच्या हृदयावर शस्त्रक्रिया केली गेली. नका त्रास देऊ त्याला.”

दृश्य ५. - “ए तू जास्त शहाणपणाने बोलू नकोस. तूझे काम केर काढायचे. असले हलके काम करणा-यांनी आम्हाला शिकवायची गरज नाही, भिकारडी कुठली” 

डायनिंग टेबलची खुर्ची नाक उंचाउन बोलली आणि सगळे उच्चभ्रू परत एक वेळ मोठ्या आवाजात वॉशिंग मशीनला सुनाऊ लागले. 

दृश्य ६ - किचनमध्ये वॉशींगमशीनचा खडाड् खट्, खडाड् खट्, ऊंsss खडाड् खट्, खडाड् खट् ऊंsss, ऊंsss आवाज ऐकु जातो. तिच्या कपाळावर एक आठी उमटते. काय झाले आहे पाहायला ती वॉशिंग मशिनकडे येऊ लागते. तिला येताना पाहून खुर्ची, टेबल, फॅन, शोपिसेस, वॉल हॅंगीग्ज, केरसुनी सर्वजण गप्प बसतात. आणि घरामध्ये घुमू लागतो वॉशींगमशीनचा आवाज, खडाड् खट्, खडाड् खट्, ऊंsss खडाड् खट्, खडाड् खट् ऊंsss, ऊंsss

दृश्य ७ - तिने फोन लावला. थोड्याच वेळात वॉशिंगमशीन दुरूस्त करणारा मेकॅनिक येतो. वॉशिंगमशीन चेक करतो. दुरस्तीचा खर्च सांगतो. खर्चाचा आकडा ऐकून ती आपल्या पतीला फोन करते. जुने मशीन वारंवार दुरूस्त करण्यापेक्षा नवीन वॉशिंगमशिन घ्यायचा निर्णय दोघेही एकमताने घेतात.

दृश्य ८ - जुन्या वॉशिंगमशिनची रवानगी भंगारमध्ये होणार व नवीन मशीन येणार हे डायनिंग टेबल, खुर्च्या, सिलींग फॅन, शो केस मधील बाहुल्या, शो पिसेस, भिंतीवरील चित्रे, हॅंगीग्ज सगळ्यांना समजते. केरसुनी बोलते.

"झाले समाधान सगळ्यांचे. पण लक्षात ठेवा ही माणसाची जात आहे. आपल्याला उपयोग नसलेल्या वस्तु ते असेच प्रथम अडगळीत टाकून देतात आणि नंतर कबाडखान्यात. वय झाले, वेळ आली की सगळ्यांचीच ही अवस्था होणार हे लक्षात घ्या."

दृश्य ९- केरसुनीचे बोलून संपले आहे पण आता सगळेच गंभीर झाले आहेत. सर्वात जास्त वाईट वाटत आहे डायनिंग टेबल व खुर्च्यांना. पण वाईट वाटून आता काय उपयोग. वॉशिंगमशीन जात्यात आणि आपण सुपात हे सगळ्यांना कळून चुकले आहे.

दृश्य १०- डायनिंग टेबल, खुर्च्या व इतर सर्व एकदमच वॉशिंगमशीनशी बोलू लागतात. 
"मित्रा माफ कर आम्हाला. तारुण्याच्या मस्तीत एक दिवस आम्हीही वृद्ध होणार हे आम्ही विसरलो. कारण नसतांना तुझा तिरस्कार केला, तुला काय वाटेल याचा विचार न करता नको नको ते बोललो. खुप दुःख दिले तुला. पण मित्रा अगदी मनापासून आम्ही सगळे तुझी माफी मागतो. शक्य असेल तर आम्हाला माफ कर."

दृश्य ११- जुन्या मशिनला घराबाहेर काढले जाते. जातांना वॉशिंगमशीन सगळ्यांकडे एक दृष्टी टाकते पण कांहीही बोलत नाही. आपल्यातील एकजण आज कमी झाला याचे दुःख डायनिंग टेबल, खुर्च्या व इतर सर्वांना होते. केरसुनी तर आपले अश्रू आवरू शकत नाही.

वॉशिंगमशिनला टेम्पोमध्ये चढवले जाते. वॉशिंगमशीनची जागा रिकामी होते. ती रिकामी जागा पाहत असतांना सर्वांना दुःख होते पण .....   

दृश्य १२- घरी नवीन वॉशिंगमशीनचे पदार्पण. तो आणि ती दोघेही आनंदात. परत एक वेळ वॉशिंगमशीनमध्ये धुण्यासाठी कपडे, वॉशिंग पावडर टाकली जाते. घाणेरडे, मळलेले कपडे मशीनमध्ये दार उघडून टाकले जातात. विजेचे बटन दाबले जाते. नेहमीप्रमाणे कपडे स्वच्छ करण्याचे, कपड्यावरील डाग काढून टाकण्याचे नवीन वॉशिंगमशीनचे काम सुरू होते, ते तसेच सुरू राहणार आहे .... म्हातारे होईपर्यंत... 
- आजचे बोल अंतरंगाचे पूर्ण