Sangli Samachar

The Janshakti News

साठवावे क्षण आनंदाचे... (✒️ राजा सांगलीकर)



| सांगली समाचार वृत्त |
बंगळूरु - दि. ३० ऑगस्ट २०२४
आजचे जीवनः खुप धावपळीचे, धकाधकीचे, स्पर्धेचे, संगणक, इंटरनेट, आर्टिफिशल इंटीलजन्सचे. एकत्र कुटुंब पद्धती कधीच लयाला गेली आहे. छोटे कुटुंब, दार बंद फ्लॅट-घरे, मी, माझे, आत्मकेंद्रीतची संस्कृती उदयास आली आहे. टीव्ही, इंटरनेट, यूट्यब वर त्याच त्याच रटाळ, कंटाळवाण्या सिरीयल, टीआरपी वाढविण्यासाठी वारंवार दाखविली जाणारी एकच-एक बातमी, चर्चा, व्हिडीओ किल्प्स, हाणामारीने भरलेले सिनेमांची चलती, यातून ना मनोरंजन, ना ज्ञानग्रहण, बस्स फक्त वेळेचा अपव्यय इतकेच. भरीस भर ही महामारी.

नोकरी-व्यवसायातून निवृत्त झालेल्या वृद्धांची समस्या वेगळीच. त्यांच्याकडे खुपसा वेळ मोकळा. खायला उठणा-या या मोकळ्या वेळेचे काय करायचे, कसा घालवायचा?

अशा या परिस्थितीमध्ये दिवस कधी उगवला, कधी संपला हे जरी समजत नसले तरी आला दिवस पार पडला ना हुश्श .... मानसाचा यंत्रमानव बनत चालला आहे कां ?
असे हे सगळे नकारार्थी, उदास, अस्वस्थ, बेचैन मनात घोंघवणारे विचार.  
ह्याचा अर्थ असा का की हे सगळे नकारार्थी, उदास, अस्वस्थ, बेचैन विचार, म्हणजेच आजचे मानवी जीवन ?   

नाही, बिल्कुल नाही ! सद्यस्थितीत हे सर्व कांही अंशी जरी खरे असले तरी दैनंदिन जीवनातील आजच्या या परिस्थितीही मन आनंदीत करणारे, मनाला सुखवणारे, प्रसन्न करणारे प्रसंग, घटना, क्षण, क्षणाक्षणाला येत असतात, फक्त आवश्यकता असते त्यांना जाणून घेण्याची, त्यांची साठवण करण्याची. हे कसे साध्य कसे करता येईल हे रोजच्या दैनंदिन जीवनातील कांही उदाहरणातून समजाऊन घेऊ.

प्रसंग १ - दिवस सुट्टीचा, वेळ सकाळची, पुढ्यामध्ये चहा किंवा नेस कॉफीचा कप. मंद वास दरवळत असलेला गरमागरम, वाफळलेली चहा - कॉपी पिण्यातील आनंद डोळे व विचार वर्तमानपत्रात, स्मार्टफोनमध्ये गुंतलेले असले की जाणवत नाही. वर्तमानपत्रातून, स्मार्टफोनमधून एक क्षण बाजूला काढायचा, चहा-कॉफीच्या कपाकडे दृष्टी टाकायची आणि त्यांचा तो मंद वास नाकातून हृदयापर्यंत पोहचला की मन कसे प्रसन्न होते ते अनुभवयाचे.

प्रसंग २ - सकाळी बागेत किंवा टेरेसवर किंवा रस्त्यावर फिरायला जाणे. अशा वेळी एक तर मनात कांही विचार घोळवत किंवा सोबत जो कोणी असेल त्याच्या बरोबर राजकारणासारख्या लोकप्रिय विषयावर गप्पा-गोष्टी, चर्चा चालत असताना करायची. बाजूला काय घडत आहे, याचा पत्ता नाही. अशा स्थितीत मनाला आनंद कसा मिळेल? पण सकाळच्या या शांत क्षणी एक नजर विशाल आकाशाकडे, पूर्व दिशेल्या वारंवार बदलणा-या सुंदर कॅलिडीओस्कोपकडे टाकली, किंवा झेन गुरू सांगतात त्याप्रमाणे चालताना, पावलांचा पृथ्वीवर होणारा स्पर्श अनुभवला, त्या जगन्नायकाने आपल्याला पायाची देणगी दिली, यासाठी कृतज्ञतेचा एक विचार मनात आणला, किंवा रस्त्याच्या कडेला उगवलेले रानफूलही कसे मस्त स्मितहास्य करत आहे हे पाहिले, जाणवले की पूर्ण दिवसभराच्या आनंदाची शिदोरी मिळालीच हे नक्की. म्हणतात ना Morning shows the day अर्थात जशी सकाळ तसा दिवस.

प्रसंग ३ - ट्रॅफिक जाम, बस-रेल्वे लेट-उशीरा. कंटाळवाणे क्षण, जायच्या ठिकाणी वेळेवर पोहचू की नाही ही चिंता, ताण, ... नको ते विचारांनी मन ग्रासलेले. अशा वेळी सहज नजर बाहेर टाकली व बाजूच्या कार-बसमधील, रेल्वेतील शेजारच्या सीटवरील लहान मूल आपल्याकडे पाहून हात हालवताना, हसताना दिसले की, व्वा, खुप छान, मस्त असे विचार मनात उठलेच पाहिजेत. त्याची ती निरागसता, चेह-यावरील हास्य, अपरे नाक, गोल-गुबगुबीत गाल सर्व चिंता, ताण, कंटाळा, नको ते विचार कुठल्याकुठे पळवुन लावतात.

प्रसंग ४ - नोकरी, व्यवसायाचे ठिकाण. नेहमीप्रमाणे कामाचे ओझे, सहका-याशी वाद, बॉसने झापणे .... दुपारच्या जेवणासाठी डबा उघडला. घरातून बाहेर पडताना दोन डोळ्यांनी सांगितलेला निरोप, ‘आज मुद्दाम तुमच्या आवडीची भाजी, गोड पदार्थ डब्यात दिला आहे. “बस्स, एक छोटीशी आठवण पण मन खूष. कामाचे ओझे, सहका-याशी वाद, बॉसचे झापणे, झालेला मनस्ताप, सगळ्यांचा विसर पडतोच.


प्रसंग ५ - दिवसभराचे काम आटोपून घरी परत. दारावरची बेल वाजते. दाराबाहेर शेजारी. त्याच्या मुलाच्या वाढदिवसाचा किंवा वृद्ध आई-वडीलांच्या एकसष्टीच्या कार्यक्रम सुरू. घरी येण्याचा आग्रह. त्याच्या घरातील आनंदाचे वातावरण उपस्थित सर्वांचे मनही आनंदीत करते.

प्रसंग ६ - घरी एकटे. टीव्ही, यूट्यूब पाहायचा कंटाळा. दारे-खिडक्या बंद करून एकांत, आपल्या आवडत्या संगीताची, गाण्याची सीडी मंद आवाजात सुर आळवु लागली की मन रामारंगी रमते.  

ही कांही उदाहरणे आहेत पण दैनंदिन जीवनात क्षणाक्षणाला असे छोटे-छोटे किती तरी प्रसंग येत असतात. या क्षणात दडलेला आनंदचा अनुभव घेता आला की, धावपळीचे, धकाधकीचे, स्पर्धेचे, नैराश्याचे जीवनही आनंदी होते.
आता कुणाच्या मनात शंका येईल की असे आनंदाचे, सुखाचे क्षण, त्या त्या क्षणाला अनुभवता येतील, त्यांचा आस्वादही घेता येईल पण त्यांची साठवण कशासाठी ?

उत्तर अगदी सोपे आहे. आनंदाच्या या क्षणांची साठवण अशासाठी करायची की, आपले मन जे वढाळ आहे, नाठाळ आहे, परत-परत नकारार्थी विचार, असमाधान, अशांती, बेचैनीकडे वळते आणि दुःखी होत असते त्याला, अशा आनंदी प्रसंगाची, क्षणांची आठवण करून द्यायची आणि त्याला फिरून एकवेळ आनंदी बनवायचे.
- आजचे बोल अंतरंगाचे पूर्ण